आपल्या मुंबापुरी महानगरीत विविध समाजगट गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांच्या काही समस्या आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक राजकीय कलदेखील आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर `नवशक्ति’ सादर करत आहे, मुंबईचं अस्सल सामाजिक राजकीय विश्लेषण, `मत’पंचायत’. आज मुंबईतल्या धनगर समाजाचा आमचे प्रतिनिधी प्रकाश सावंत यांनी घेतलेला वेध.
धनगर. शेळ्या-मेंढय़ा राखणारी जमात. गोकुळ, वृंदावन आणि मथुरेहून मजल दरमजल करीत धनगर बंधू गुजरात आणि पुढे महाराष्ट्रात आले. हटकर, व्हटकर, कुटेकर, शेंगर, अहिर, कुरुबा, भारवाड, खाटिक, कोकणी धनगर यासह धनगर समाजाचे जवळपास 14 उपघटक. शंकर, विष्णू, पार्वती, महालक्ष्मी ही त्यांची कुलदैवते. विरोबा, शिदोबा, खंडोबा, म्हसोबा, विठोबा, तुळाई, यमाई, अंबाबाई त्यांचे देव. धनगरी ओव्या गुणगुणायला लावणार्या नि धनगरी नृत्य म्हणजे कुणालाही ठेका धरायला लावणारे. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास धनगरांची वर्षाचे आठ महिने भटकंती. त्यांचे मार्गही ठरलेले. घोडय़ावर संसार. शेळ्या-मेंढय़ा, कुत्रे, कोंबडय़ा त्यांचे सखेसोबती. ना घर ना दार, नाही शिक्षण, नाही नोकरी अशा बिकट अवस्थेत भटकंती करणारे धनगर बंधू. अजूनही सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागासलेले आणि राजकीयदृष्टय़ा असंघटित.
धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा, अशी शिफारस राज्य सरकारने 20 ऑगस्ट 1966 रोजी केंद्र सरकारला केलीय. मात्र, एवढी वर्षे उलटून गेली तरी अजून प्रश्नाची तड लागलेली नाही. त्यातच, जातींचे आरक्षण ठरविताना `धनगर’ऐवजी `धनगड’ असा उल्लेख केला गेल्याने धनगर बंधूंची प्रदीर्घ काळ फरपट सुरू आहे. `भटक्या विमुक्तां’ऐवजी `अनुसूचित जमाती’चे लाभ देण्याच्या मागणीला सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्यात. त्यामुळे धनगर समाजात तीव्र असंतोष खदखदतोय.
धनगर समाजोन्नती मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळ आणि यशवंत सेनेचे अध्यक्ष आणि आमदार रमेश शेंडगे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव अर्जुन, तुकाराम हाके, संजय हाके आदींशी `मत पंचायत’च्या माध्यमातून संवाद साधला असता, समाजाला भेडसावणार्या विविध प्रश्नांची उकल होत गेली.
ना नगरसेवक ना खासदार !
मुंबईत धनगर समाजाची लोकसंख्या कुणी चाळीस हजार म्हणतेय तर कुणी पाच लाखाच्या आसपास असल्याचे सांगतेय. मुंबईत समाजाचा एकही नगरसेवक, आमदार, खासदार वा मंत्रीदेखील नाही. मानखुर्द-शिवाजी नगर, गोवंडी, देवनार, चेंबूर-घाटला गाव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे, विलेपार्ले, मालाड, कांदिवली, बोरिवलीत समाजाची प्रामुख्याने वस्ती आहे.
शिवाजी महाराजाप्रमाणेच वेदीक पद्धतीने राज्याभिषेक करणारा एकमेव राजा म्हणून यशवंतराव होळकर यांचा उल्लेख केला जातोय. समाजाच्या मान्यवरांच्या नामावळीत पद्मश्री ना.धों. महानोर, विमानांचे गिअर बनविणार्या अमेरिकेतील `यूएस एरोमोटिव’चे डॉ. सुहास काकडे, पहिले बॅरिस्टर तुकाराम शेंडगे, जिल्हाधिकारी जराड, राजूरकर आदींची नावे घेतली जात आहेत.
पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व नाही !
राज्याचे पहिले मंत्री म्हणून मल्हारराव माहुलकर यांचे नाव घेतले जात आहे. राज्याचे मंत्री म्हणून गणपतराव देशमुख, शिवाजीराव शेंडगे, अण्णा डांगे, आनंदराव देवकाते यांनी एक काळ आपली हुकूमत गाजवलीय. याआधी पहिले आमदार म्हणून अण्णासाहेब लेंगर यांनी कामगिरी बजावलीय. सध्या ज्येष्ठ संसदपटू गणपतराव देशमुख, प्रकाशअण्णा शेंडगे, अनिल गोटे, हरिदास भदे, रमेशभाऊ शेंडगे असे पाच आमदार कार्यरत आहेत.
एकेकाळी अहिल्यादेवी, मल्हारराव, यशवंतराव यासारख्या राजांनी 56 वर्षे राज्य केले. पण, आता राज्यातील 21 लोकसभा मतदारसंघात आणि 130 विधानसभा मतदारसंघांत धनगर समाजाची 50 हजारापासून 3 लाखापर्यंत लोकसंख्या असूनही समाजबांधवांना राजकारणात पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नाही. सत्ताधार्यांनी समाजबंधूंची केवळ फरपट चालविल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत.
शेतीपुरक उद्योगाचा दर्जा हवाय !
जगातील सर्वात जुन्या व्यवसायापैकी एक असलेल्या शेळी-मेंढी व्यवसायाला अजून शेतीपुरक उद्योगाचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यांचा सहा हजार वर्षांपूर्वीपासूनचा सर्वात जुना व्यवसाय म्हणजे शेळी-मेंढी पालनाचा. या व्यवसायाच्या माध्यमातून दूध, मटण आणि लोकरीचे उत्पन्न मिळतेय. तथापि, गेल्या आठ वर्षांत भटक्या-विमुक्तांच्या कल्याणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद झालेली नाही. शेळी-मेंढी महामंडळासाठी दीडदमडीची तरतूद केलेली नाही. लोकरीवर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प राज्यात नाही. मटण निर्यातीविषयी राज्य सरकारचे कोणतेही ठोस धोरण नाही. धनगर समाजामार्फत वारंवार मागणी करूनही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारले जात नाही. सोलापूर विद्यापीठाला मल्हारराव होळकरांचे नाव देण्याची मागणी मान्य होत नाही. सरकार दरबारी असा `नन्ना’चा पाढा सुरू आहे. धनगर समाजाची गत अगदी मेंढरावानी झालीय. त्यांच्यावर आता `सरकार’परास म्यांढरं बरी’ असे म्हणण्याची वेळ आलीय.
http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/36491/
No comments:
Post a Comment