Monday, 7 April 2014

(35) धनगरांची त्याच दिवशी खरी दिवाळी !

दिवाळी म्हणजे भल्या पहाटेच्या अंघोळी, दिव्यांची रोषणाई, फुलबाज्यांची फुलं, फटाक्यांचे धमाके, फराळाची रेलचेल...दिवाळीचं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उमटतं. पण हे झालं शहरात किंवा सुखवस्तू घरात. पण ज्यांचं बिऱ्हाड पाठीवर आहे अशा फिरस्त्या धनगरांची दिवाळी कशी असेल? अशी दिवाळी पाहायला मिळाली, अजिंठा वेरुळच्या रस्त्यावर. 

वसू बारसेचा दिवस होता. रानात मेंढ्यांची वाघूर पडली होती. या तीन-चारशे शेळ्या-मेंढ्यांच्या शेजारीच त्यांचे पालनकर्ते अर्थात धनगराचं कुटुंब बसलं होतं. तीन दगडाच्या चुलीवर कुटुंबाची माय भाकऱ्या थापत होती. विशेष म्हणजे आजपासून दिवाळी सुरु झालीय हे या कुटुंबाला माहीत होतं. पण त्यांना त्याचं फारसं विशेष नव्हतं. त्यांना काळजी होती, त्यांच्या लक्ष्म्यांची, शेळ्या-मेंढ्यांची! तोच त्यांचा बोलण्याचा विषय होता. 

साथीचा आजार होऊ नये म्हणून मेंढ्यांना कसलं तरी औषध पाजलं जात होतं...'यंदा पावसानं दगा दिला. पिकांना फटका बसला. शेतकरी सुखी तर धनगर सुखी. दुष्काळानं धनगरांच्या तोंडचं पाणी पळवलं. शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी चारा मिळेना. या चाऱ्यासाठी अजूनही भटकंती सुरू आहे. कारण या शेळ्यामेंढ्यांवरच आमचं जगणं अवलंबून आहे', तांड्याचा कारभारी सांगत होता. 'मेंढरं शेतात बसवली म्हणून पूर्वी शेतकरी त्यांना पायलीभर धान्य द्यायचा. कारण शेताला शेळ्यामेंढ्याचं पोषक खत मिळायचं. आता या शेळ्यामेंढ्यांचं पोषण करणं हेच आमचं काम आहे. कारण त्यांच्यावरच आमचं जगणं अवलंबून आहे. त्यांना ज्या दिवशी मुबलक चारा-पाणी मिळेल, त्याच दिवशी आमची खरी दिवाळी', असं ते जाता जाता सहज सांगतात.  


-विवेक राजूरकर, औरंगाबाद

No comments:

Post a Comment