Thursday, 10 April 2014

(41) स्मरण फॉरेनच्या वारकऱ्याचं

२२ जानेवारी २००९ च्या 'महाराष्ट्र टाइम्स' मधून...

पंढरीच्या 'काळ्या'ने किंवा खंडोबाच्या भंडाऱ्याने फक्त महाराष्ट्रालाच वेड लावलं असं नाही, तर देशपरदेशातही असे अनेक वेडे जन्माला आले. एवढी सारं माणसं या विठोबा-खंडोबामधे कसे विरघळून जातात, ते पाहण्यासाठी हे फिरंगी इथे आले आणि स्वत:च वारकरी बनून गेले. असाच एक जर्मन वारकरी... गुंथर सोन्थायमर. त्यांच्या दुमिर्ळ डॉक्युमेण्टरींचा महोत्सव फेब्रुवारीमधे मुंबईत होणार आहे. 

महाराष्ट्राच्या काळ्या मातीतल्या या देवदवतांचा शोध घेण्यासाठी या वारकऱ्याने आपल्या आयुष्यातली तीन दशके वेचली. ते चंदभागेच्या वाळवंटात हरवले, वारीच्या रिंगणात नाचले आणि भंड्याऱ्यांच्या उधळणीत पिवळेधमक झाले. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत या देवतांची पालखी खांद्यावर वाहत त्यांनी १९९२ मधे आपली जीवनयात्रा संपवली. पण या साऱ्या प्रवासात जे त्या डोळ्यांनी पाहिले ते त्यांनी शब्दांमधे, ऑॅडिओ-विडीओमधे नोंदवून ठेवलंय. 

पंढरीत असे काय लावून ठेवलंय की लोक तहानभूक विसरून हजारो मैलांचा प्रवास करत वारी करतात. याचा शोध घेण्यासाठी ते तब्बल आठ वर्षं ते पंढरपूरला पायी येत होते. जर्मनी, इंग्लंडमधे शिकलेल्या या मानवंशशास्त्रज्ञाने यासाठी मराठी शिकून घेतलं. ते या वारीच्या एवढे प्रेमात पडले की... 'मी आता जगातले सगळे विसरून गेलोय. जगाला तारणारे भागवत संप्रदायाच्या वारीइतके तत्त्वज्ञान मला कुठेही पाहायला मिळालं नाही,' असं मत त्यांनी बाळासाहेब भारदे यांच्याकडे व्यक्त केलं होतं. यातूनच त्यांना भागवत संप्रदायाचा जो अर्थ प्रेरीत झाला, तो मांडण्यासाठी त्यांनी वारीवर 'अॅन इंडियन पिलिग्रिमेज' ही डॉक्युमेण्टरी तयार केली. 

विठ्ठलाप्रमाणेच खंडोबाच्या गांेधळानेही या वारकऱ्याला भारून टाकलं. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश तसंच गोव्यातही भक्तसंप्रदाय असणारा हा असा काय लोकदेव आहे, याचा शोध घेत सोन्थायमर चौदा वर्षं जेजुरीत राहिले. त्यात त्यांनी खंडोबाचे धनगर समाजातील बाणाईशी होणाऱ्या लग्नाचा अर्थ शोधला, वाघ्या-मुरळीच्या सामाजिक स्थानाची चिकित्सा केली तसंच खंडोबाच्या ४२ किलो तलवारीचंही डॉक्युमेण्टेशन केलं. त्यावरही त्यांनी 'किंग खंडोबा' नावाची एक डॉक्युमेण्टरी बनवली. 

या देवतांप्रमाणेच लोककला-लोकसंगीत यावरही सोन्थायमर यांनी प्रचंड काम केलं. हटकर धनगर या मंेढपाळ जमातीतील विविध प्रथा आणि परंपरांवर त्यांनी एक विशेष डॉक्युमेण्टरी केलीय. त्यात या समाजात चालत आलेली अनेक लोकगीतं त्यांनी रेकॉर्ड करून सादर केलीत. इतिहासजमा होत असलेला हा वारसा जपून ठेवण्यासाठी सोन्थायमर यांनी केलेलं हे काम अनेकांना प्रेरणा देत राहील. 

ऐशी आणि नव्वदच्या दशकामधे जुन्या पद्धतीने केलेलं हे रेकॉडिर्ंग आता डीवीडी स्वरूपामधे आणलं गेलंय. हेनिंग स्टेग्युम्युलर यांनी सोन्थायमर यांच्या या दुमिर्ळ दस्तावेजाचं डिजिटलायझेनशन केलंय. नव्या स्वरूपात आणलं गेलेलं हे ऐतिहासिक वैभव पाहण्याचा योग मुंबईकरांना या महोत्सवातून मिळणार आहे. 

खरं तर या फॉरेनच्या वारकऱ्याचे आपल्यावर फार मोठं ऋण आहे. त्यांच्या या डॉक्युमेण्टरी पाहून जर आपल्याला आपलंच संस्कृतीवैभव उमगलं. ते जपण्याची प्रेरणा मिळाली. तरी त्या ऋणातून थोडीफार उतराई होऊ शकेल. 
.... 

सोन्थायमर महोत्सवाबद्दल... 

मॅक्समुलर भवन, एशियाटिक सोसायटी आणि यशवंतराव चव्हाण केंद्र यांच्या तर्फे १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान गुंथर सोन्थायमर अर्काइव्ज महोत्सव होणार आहे. यात किंग खंडोबा, जर्नी ऑॅफ हटकर धनकर, वारी-अॅन इंडियन पिलिग्रिमेज, किंग खंडोबा हंटिंग एक्सपिडिशन आणि डिव्हाइन प्ले ऑॅन अर्थ अशा पाच डॉक्युमेण्टरी दाखवण्यात येतील. तसंच सोन्थायमर यांच्या कारकीदीर्वर दि.पु. चित्रे, डॉ. अरुण टिकेकर आणि हेनिंग स्टेग्युम्युलर प्रकाश टाकतील. मंत्रालयाजवळच्या यशवंतराव चव्हाण केंदात सायंकाळी सहा वाजता हा महोत्सव होणार आहे. 

- नीलेश बने

1 comment:

  1. वरील बातमी संदर्भात अजून थोडी माहिती सांगू इच्छितो ती म्हणजे, भारत सरकार संचलित 'इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र' मध्ये सदर बातमीमधील चार डॉक्युमेण्टरीज उपलब्ध आहेत (http://ignca.gov.in/faq_body.htm). तसेच गुंथर सोन्थायमर यांचे 'KING OF HUNTERS, WARRIORS AND SHEPHERDS' हे पुस्तक देखील याच केंद्राने १९९७ साली प्रकाशित केलेले आहे. पुस्तकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी - http://ignca.gov.in/ks_35.htm

    ReplyDelete