श्री विठ्ठलाच्या दैवत माहात्म्याचा इतिहास किमान इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. श्री विठ्ठल म्हणजे दैवतप्रतिष्ठा प्राप्त केलेला पौंड्रवंशीय कुरुब - धनगरांचा महान शिवभक्त आणि सम्राट. पौंड्रपुर म्हणजे आजचे पंढरपुर ही त्याची राजधानी. वारीची प्रथाही श्री विठ्ठलाला दैवत माहात्म्य प्राप्त झाले , त्या काळाइतकीच जुनी आहे , असे म्हणता येते. म्हणजेच वारीचा इतिहास हा २२०० वर्षे इतका जुना असल्याचे म्हणता येईल. अर्थात आज ज्या पद्धतीने वारी निघते तशी ती पुरातन काळी निघत नव्हती , एवढे नक्की. कालौघात श्री विठ्ठलही शैवाचा वैष्णव बनला. नामदेवांपासून ते तुकोबारायांपर्यंतच्या संतांनी श्री विठ्ठलाला कृष्ण-विष्णू रुपातच पाहिले. त्यामुळे वारीचे स्वरुपही बदलले. या वारीच्या इतिहासाचा आपण येथे आढावा घेऊ या ...
श्री विठ्ठल हा मूळचा धनगर-कुरुबांचा देव होता , हे मत डॉ. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ' श्री विट्ठल : एक महासमन्वय ' या महनीय ग्रंथात मांडले आहेच. आजही सोलापूर जिल्हा व त्यास लागून असलेल्या कर्नाटकच्या भागात धनगर-कुरुबांची संख्या लक्षणीय आहे. धनगर-कुरुबांच्या जीवनशैलीचे निरीक्षण केले तर एक महत्त्वाची बाब लक्षात येते व ती म्हणजे आषाढ महिन्यात (अगदी आजही) विविध दिशांना आपल्या मेंढ्यांच्या कळपासह गेलेले धनगर आषाढ महिन्यात परत येतात. पावसाळा संपला की कार्तिक महिन्यात ते पुन्हा चाऱ्याच्या शोधात आपले पशुधन घेवून चहूदिशांना बाहेर पडतात.
पौंड्रपुर तथा पंढरपूर ही त्यांची राजधानी असल्याने व त्यांचे आद्य आराध्य दैवत श्री विठ्ठलही तेथेच असल्याने त्यांचे सर्वप्रथम एकत्र होण्याचे स्थान असणे स्वाभाविक होते. श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपले पशुधन वाढेल , ही श्रद्धा या प्राथमिक वारीचे कारण बनली. विठ्ठल ही देवता किमान सहाव्या शतकापर्यंत फक्त धनगर-कुरुबांची आराध्य देवता होती , असे आपल्याला दिसते. याचाच अर्थ असा की वारीचा प्रारंभ धनगरांनी केला. ही वारी आपल्या पशुधनासहितची होती. तिचे स्वरूपही काहीसे प्राथमिक होते.
सहाव्या शतकापर्यंत या अवैदिक विठ्ठलाचा बोलबाला अन्य समाजांतही होवू लागला. विठ्ठल हे नाम अगदी ब्राह्मणही धारण करू लागले. सहाव्या शतकातील एका ताम्रपटात ' जयद्विठ्ठ ' नामक ब्राह्मणाला गावाचे दान दिले आहे , अशी नोंद आहे. हा ब्राह्मण पंढरपूरचाच होता. मध्वाचार्यांनी (इ.स. ११९९-१२७८) ज्ञानेश्वरपूर्व काळातच आपल्या आठ बालयतींपैकी तिघांना विठ्ठलाची मूर्ती पुजेसाठी दिली होती , असे श्री. द. रा. बेंद्रे सांगतात. याचाच अर्थ असा की , श्री विठ्ठल ही देवता आता फक्त धनगरांपुरती मर्यादित न राहता त्याचे प्रभावक्षेत्र विस्तारित होवू लागले होते. याच काळात विठ्ठलाचे मूळचे शैव रूप जावून त्यास क्रमश: वैष्णव रूप प्राप्त होवू लागले. आषाढी-कार्तिकीला आता फक्त धनगर-कुरुबच नव्हे , तर कुणबी , ब्राह्मण ते अन्य बलुतेदार-अलुतेदारही सामील होवू लागले. ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनीही पंढरीची वारी केली होती , असे नामदेव महाराज म्हणतात. आता विठ्ठल हे सर्वच समाजाचे दैवत बनू लागल्याने आषाढी-कार्तिकीचे परिप्रेक्ष बदलले... अर्थातच वारीचे स्वरुपही पालटू लागले.
महाराष्ट्रातील तेराव्या-चवदाव्या शतकाचा कालखंड अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. वाढती सामाजिक विषमता , जातीनिष्ठ अन्यायांची परंपरा , वैदिक कर्मकांडांचे वाढलेले स्तोम यामुळे एक अभिनव संतपरंपरा सुरू झाली. या संतांनी एकही प्रख्यात वैदिक देवता आपल्या सामाजिक/आध्यात्मिक चळवळीसाठी न स्वीकारता अवैदिक विठ्ठलाला आपले मुख्य आधार मानले व समतेची चळवळ सुरु केली ... समतेची , मानवी करुणेची गुढी उभारली. राष्ट्रसंत नामदेव , चोखा मेळा , ज्ञानेश्वर , गोरोबा कुंभार , परिसा भागवत आदी संतांच्या मांदियाळीने वारीला एका सामाजिक चळवळीचे रुप दिले , ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नवी क्रांती घडवणारी घटना होती. नामदेव अत्यंत उत्साहाने म्हणतात ... ' आले आले रे हरीचे डिंगर ... वीर वारीकर पंढरीचे '. संतच नव्हे तर सर्वच समाजासाठी श्री विठ्ठल हा पतीतपावन बनला , तो याच काळात. कारण स्वत: श्री विठ्ठलालाही वैदिक परंपरेने शूद्र मानलेले. त्यामुळे समतेच्या गुढीसाठी सर्वच संतांनी विठ्ठलाला आपले आराध्य मानले नसते तरच नवल होते.
त्यामुळे वारीचे स्वरुप आणखी बदलले. आषाढी-कार्तिकी या परंपरा कायम राहिल्या असल्या तरी एकादशीला महत्त्व मिळाले ते वैष्णव परंपरेमुळे. आता वारी निघू लागली ती टाळ-मृदंगांच्या साथीने ... भक्तिरसाने ओथंबलेली संतरचित भजने गात. भीमथडी चिंब भिजू लागली ती संतांच्या उत्कट आत्मोद्गारांनी. विठ्ठल हा त्यांचा नुसता देव नव्हे , तर सखा बनला. व्यथा-वेदनांवर केवळ फुंकर घालणारा नव्हे , तर प्रसंगी प्रत्यक्ष अवतरुन संकट-विमोचन करणारा मुक्तिदाता बनला. जनमानसातील श्री विठ्ठलाची प्रतिमाही त्यानुसार बदलत गेली. वारीला सर्वच जाती-पंथांच्या समाजांत एक महत्त्वाचे स्थान निर्माण होवू लागले. नामदेवांनी तर देशभर श्री विठ्ठलाची महत्ता पसरवली.
नामदेवांनंतर शंभर वर्षांनी (सन. १४५०) एकनाथांचे पणजोबा भानुदासांनीही वारीची परंपरा कायम ठेवली. परंतु या मधल्या काळात वारीची संतनिर्मित परंपरा काही प्रमाणात क्षीण झाल्याचे दिसते. एकनाथांच्या काळात महाराष्ट्रावर सुलतानी संकट आले होते. अशा अत्यंत अस्थिर व शोषित-अन्यायग्रस्त कालात एकनाथांनी वारकरी संप्रदाय पुनर्जिवित केला. असंख्य अभंग तर लिहिलेच , त्याखेरीज विपुल ग्रंथरचनाही करुन गुलामीतील स्वबांधवांना पुन्हा समतेच्या वारकरी चळवळीकडे आकृष्ट केले. फक्त समतेचाच नव्हे , तर फारसी-ऊर्दुच्या प्रभावाखाली जावू लागलेल्या मायमराठीचा नव्याने उद्घोष केला... वारी पुन्हा नव्या जोषात सुरू झाली. एकनाथांच्या निर्वाणानंतर नऊ वर्षांनी जन्माला आले ते महान संत तुकोबाराय. त्यांनी सामाजिक वेदनांवर नेमके बोट ठेवत ज्या अजरामर रचना केल्या आहेत त्यांना तोड नाही. त्यांच्यानंतर अशा असामान्य प्रतिभेचा संत जन्माला आला नाही. तुकोबांनी त्यांच्या काळात वारकरी संप्रदायाला अपरंपार वाढवले. गुलामी राजवट नष्ट करणारे छत्रपती शिवराय घडले तो काळ निर्माण करण्याचे सर्व श्रेय तुकाराम आणि त्यांच्या पूर्व संतपरंपरेकडे नि:संशयपणे जाते.
तुकोबारायांनंतर वारीपरंपरेत आणखी एक अभिनव बदल घडला. तुकारामांचे चिरंजीव नारायणमहाराज यांनी तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवून दिंडीची संकल्पना सन १६८५ मध्ये निर्माण केली. त्यात नंतर अनेक संतांच्या अशाच पालख्या त्यांच्या-त्यांच्या मूळस्थानापासून वा जेथे ते दिवंगत झाले त्या स्थानांपासून पंढरीला येवू लागल्या. आपल्या महान पूर्वसुरींना हे अभिनव अभिवादन होते. परंतु अशा दिंड्यांत शक्यतो ज्याची पालखी त्याच संताचे अभंग म्हणण्याची प्रथाही पडली. वारकरी संप्रदायही जातींत वाटला गेल्याचे चित्र दिसू लागले. आता आतापर्यंत ज्ञानेश्वरांच्या पालखी-दिंडीत तुकारामांचे अभंग म्हटल्यास पार मारामाऱ्या होत. सुदैवाने आता असे प्रकार घडत नाहीत. घडूही नयेत , कारण ज्या जातीअंताच्या महनीय कार्यासाठी संतांनी वारीप्रथेला अध्यात्म-समतावादी बनवले त्यांच्यावर हा केवढा अन्याय होइल ?
तुकोबारायांनंतर निळोबांनी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे वाहिली.
वारी आजही सुरु आहे. आधुनिक काळात तिच्यात बदल घडत आहेत , पुढेही घडत राहतील. परिवर्तनशीलता हाच जीवनाचा नियम आहे. वारीची पद्धत बदलेल , पण श्रद्धा तीच राहील. धनगर-कुरुबांनी २२०० वर्षांपूर्वी सुरु केलेली ही परंपरा नवनवे आशय घेत पुढे जात राहो , हीच सदिच्छा !
- संजय सोनवणी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14515051.cms?prtpage=1
No comments:
Post a Comment