महाराष्ट्रात धनगर समाजाच्या जाती-पोटजातींचा मोठा पसारा आहे. धनगरांची लोकसंख्या महाराष्ट्रात 15 टक्क्यांपेक्षा अधिक असावी. मात्र, राजकारणात व समाजकारणात या समाजाचा टक्का म्हणावा तेवढा वाढलेला दिसून येत नाही. या समाजाचा मोठा भाग शिक्षणापासून आणि सामाजिक सुधारणांपासून वंचित आहे. शेळ्या-मेंढ्यांचं पालन या पारंपरिक व्यवसायावरच तो जगत आहे. मात्र, या समाजातले जे काहीजण गावगाड्यात स्थिरावलेले आहेत, त्यांनी मागं पडलेल्या आपल्या बांधवांच्या प्रगतीसाठी कसून प्रयत्न करायला हवेत.
धनगर समाजाचा एक कार्यकर्ता मला भेटला. त्याचं आडनाव जानकर. या भेटीत त्यानं मला त्याच्या समाजाच्या व्यथा सांगितल्या. एकदम अस्वस्थ करून सोडणाऱ्या. जानकरचे आई-वडील शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन गावोगावी भटकंती करत असत. अशा एका भटकंतीतच जानकरचा जन्म झाला. गाव, शीव त्याला काहीच माहीत नाही. धनगर समाजाला आजही आपल्या समाजात महत्त्वाचं स्थान नाही. "धनगर बसला जेवाया...ताकासंगं शेवाया,' धनगराचं वेड बारा वाजेपर्यंत जात नाही,' अशा हिणवणाऱ्या म्हणी या समाजाबद्दल रूढ आहेत. या म्हणींद्वारे या समाजाची अवहेलनाच केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, पंढरपूर आणि संपूर्ण मराठवाड्यात धनगरांच्या अनेक जाती-पोटजाती आढळतात. आजही मेंढ्यांचे मोठमोठे कळप घेऊन फिरणारा मेंढपाळ धनगर, हाटकर धनगर, बंडगर, मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी तयार करणारा धनगर अशा वेगवेगळ्या पोटजाती त्यांच्यात आहेत. धनगरातल्या विशिष्ट जाती गावगाड्यात स्थिरावल्या असल्या, तरी शैक्षणिकदृष्ट्या म्हणावी तशी प्रगती या समाजात अजून झालेली दिसून येत नाही. एका भेटीत मी जानकरला म्हणालो ः ""महाराष्ट्रात धनगरांची संख्या मोठी आहे. तुम्ही लोकांनी सत्तेत वाटा मागितला, तर तुमचे लोक आमदार, खासदार म्हणून निवडून येऊ शकतात.'' त्यावर जानकर म्हणाला ः ""आम्हाला सगळ्यांना वेड्यात काढून राजकारणी लोकांनी व समाजानं अशी व्यवस्था केली आहे, की आम्ही फक्त शेळ्या-मेंढ्या राखतच फिरावं!'' मी म्हणालो ः ""अरे, तुम्ही धनगर वेडे नसून, अत्यंत हुशार आणि चलाख आहात. तुम्ही अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले आहेत, चांगली-वाईट परिस्थिती पाहिलेली आहे. तुमचा अनुभव कितीतरी दांडगा आहे. धनगराची पाच-सहा वर्षांची लहान लहान मुलं रानावनात शेळ्या-मेंढ्यांना करडं होत असतानाच्या वेळचा प्रसंग एकट्यानं निभावून नेतात. एखाद्या मेंढीचा किंवा शेळीचा पाय मोडला, तर तिला खांद्यावर उचलून घरी आणतात आणि पेटलेल्या आगटीमध्ये लोखंडाच्या सळया (डागण्या) लालबुंद करून मोडलेल्या शेळी-मेंढीचा पाय खटकन जोडून त्या जोडलेल्या पायाला डाग देतात. कामठ्या लावून त्याला बांधून ठेवून त्या पायाचं उत्तम ऑपरेशनही करतात! पाय मोडलेल्या मेंढ्या-शेळ्या महिन्याभरात बऱ्या होऊन पुन्हा माळरानावर चरायला मोकळ्या. खरंतर धनगर समाजातल्या या मुलांना शाळा शिकवण्याची संधी मिळाली असती, तर ते चांगल्या प्रकारचे डॉक्टर होऊन त्यांनी समाजाची सेवा केली असती.'' मात्र, "धनगराचं वेड बारा वाजेपर्यंत जात नाही,' असं हिणवून आपण त्यांना खरोखरच वेडं तर बनवत नाही ना, याचा विचार समाजानं करायला हवा.
एक जुना किस्सा सांगितला जातो ब्रिटिश राजवटीतला. घाटातून रस्ता कसा काढावा, ते ब्रिटिशांना कळत नव्हतं; त्या वेळी एका मेंढपाळानं ब्रिटिश इंजिनिअरला त्याविषयी सुचवलं. पुढं त्या घाटाला त्या मेंढपाळाचं नाव देण्यात आलं. ते आजही आढळेल. यावरून पुरेसं स्पष्ट होतं, की धनगर हे बुद्धिमान व हुशार असतात. खंडाळ्याच्या घाटात अनेक छोटे-मोठे अपघात होताना आपण पाहतो. मात्र, धनगरांच्या शेळ्या-मेंढ्यांचे कळप छोटासाही अपघात न होता सहीसलामत हा घाट पार करतात. कारण, मेंढपाळांनी या शेळ्या-मेंढ्यांना लावलेली कमालीची शिस्त! शाळेतल्या मुलांना जसं एका रांगेत चालायला शिकवलं जातं, तसंच या मुक्या शेळ्या-मेंढ्यांना हे धनगर शिकवत असावेत. या शेळ्या-मेंढ्यांना धनगराच्या काठीचा एवढा धाक असतो, की त्यानं ती काठी "हुर्रेऽऽ' म्हणून उंचावल्याबरोबर शेकडोंच्या संख्येनं असलेल्या शेळ्या-मेंढ्या खंडाळ्याच्या घाटात रस्त्याच्या कडेनं रांगेत चालू चालतात. एकही शेळी-मेंढी रांग सोडून बाहेर जात नाही व साहजिकच अपघातात मरतही नाही. खरंतर भारतात अहिल्याबाई होळकरांपासून ते अन्य राजे-महाराजांपर्यंत अनेकांनी या धनगर समाजातून येऊन किंवा अन्य राजाला दत्तक जाऊन उत्तम राज्य कारभार केलेला आढळून येतो. जानकरचा निरोप घेऊन त्याला सदिच्छा देताना मी म्हणालो: ""तू एक सामाजिक, राजकीय कार्यकर्ता म्हणून मोठा हो आणि या धनगर समाजाला संघटित कर. सत्तेत सहभागी होण्याच्या दिशेनं तुम्ही पावलं टाका.''
महाराष्ट्रात धनगर समाजाच्या अनेक जाती-पोटजातींचा मोठा पसारा आहे. या धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात 15 टक्क्यांपेक्षा अधिक असावी. मात्र, राजकारणात व समाजकारणात या समाजाचा टक्का म्हणावा तसा वाढलेला दिसून येत नाही. शिक्षणापासून आणि सामाजिक सुधारणांपासून दूर असलेला हा समाज आपला पारंपरिक धंदा-व्यवसाय करून गुजराण करत असतो. शेळ्या-मेंढ्यांचे कळप पाळत जगतो. शेतकऱ्यांच्या शेतात खतासाठी या शेळ्या-मेंढ्या बसवल्या जातात. त्याच्या बदल्यात धान्य वगैरे घेऊन हा समाज त्यावर आपली उपजीविका करत असतो. रानावनात, डोंगरमाथ्यावर शेळ्या-मेंढ्यांसह धनगरांना चढउतार करावी लागते. ऊन्ह असो की पाऊस धनगरांचे काबाडकष्ट काही चुकत नाहीत. या समाजाची अनेक कुटुंबं आजही पश्चिम महाराष्ट्रात डोंगरमाथ्यावर शेळ्या-मेंढ्यांच्या कळपांसह राहतात. त्यांची लेकरं-बाळं समाजापासून तुटलेली आहेत. शिक्षणापासून-विकासापासून ती वंचित आहेत. मात्र, या समाजापैकी गावगाड्यात स्थायिक झालेला हाटकर धनगर, खुटेकर, उटेकर हे सधन आढळतील. धनसंपत्ती आणि थोडीफार राजकीय सत्ता असणारी ही जी काही मोजकी मंडळी आहेत, त्यांनी मागं पडलेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या, शेळ्या-मेंढ्यांच्या मागं फिरणाऱ्या त्यांच्या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणखी कसून प्रयत्न करायला हवेत.
- लक्ष्मण गायकवाड
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4998761901545139032&SectionId=3&WithVideo&CommentAdded=1&SectionName=सप्तरंग
No comments:
Post a Comment