मुके जीव जगवण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागांतून तळकोकणात शेकडो मेंढरं घेऊन येणार्या धनगरांची पायपीट अंतर्मुख करायला लावणारी असते. दिवाळीनंतर घराबाहेर पडणारे हे कबिले होळीपर्यंत आपल्या घरी परततात. पाच महिन्यांचा हा त्यांचा प्रवास रोमांचकारी अनुभवांनी भरलेला असतो.
पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागांतील धनगर समाज आजही शेकडो मेंढरं पाळून या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. बदलत्या काळात या समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन वर्षानुवर्षे होणारी आपल्या आईवडिलांची फरफट थांबवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र भावी पिढीला चांगलं शिक्षण देण्यासाठी सध्याच्या मंडळींना शेकडो किलोमीटरची पायपीट करावीच लागत आहे.
एका कबिल्याकडे किमान तीनशेपर्यंत मेंढ्या असतात. पायात अस्सल जाड चामडी चप्पल, खांद्यावर घोंगडी, हातात मजबूत काठी घेऊन धनगर समाजातील दोघे किंवा तिघे दिवाळी झाल्यावर लगेचच चारापाण्यासाठी तळ कोकणचा रस्ता चालू लागतात. या कबिल्याबरोबर तीन ते चार खेचरं जेवण करण्यासाठी दोन महिला, त्यांची मुलं, खेचरांच्या पाठीवर संसारोपयोगी साहित्य, चालू न शकणारी मेंढरांची छोटी पिल्लं असं सारं सामान रचलेलं असतं. ही मंडळी नेहमी पुढे असतात. याच्यासह रात्रीच्या वेळी मेंढरांचं रक्षण करण्यासाठी दोन अस्सल धनगरी कुत्रेही सोबत प्रवास करीत असतात.
या मंडळींची दरवर्षीची मुक्कामाची ठिकाणं ठरून गेलेली आहेत. सातारा - पाटणकडील ही मंडळी अवघड अशा कुंभार्ली घाटातून तळकोकणात उतरतात. दररोज पाच ते आठ कि.मी. अंतर कापल्यावर या कबिल्याचा ढेरा पडतो. महिलावर्ग पाण्याजवळची जागा मुक्कामासाठी निवडून तंबू ठोकतात. सायंकाळपर्यंत या मुक्कामाच्या ठिकाणी मेंढारांचा कबिला पोहोचतो. दिवसभराच्या थकावटीने कडाक्याच्या थंडीतही सारं कुटुंब निद्राधीन होतं. रात्रीच्या वेळी कोकणात मेंढारांच्या कळपाभोवती हमखास बिबट्याची फेरी ठरलेलीच असते. मात्र अशा वेळी सर्व मेंढरांचं रक्षण करण्याचं काम इमानदार; परंतु तेवढेच तिखट असणारे धनगरी कुत्रे करतात. रात्रभर हे कुत्रे कळपाने बसलेल्या मेंढरांभोवती गोल गोल फिरत असतात. बिबट्या जवळपास आला तर ओरडून ओरडून कल्लोळ करतात. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून बिबट्याला पळवून लावतात.
काही शेतकरी, मेंढरं शेतात बसविण्याबद्दल धनगर मंडळींना पैसे किंवा भात देतात. पूर्वी घरातून एकदा बाहेर पडल्यानंतर पाच महिन्यांनी घरी परतेपर्यंत घराकडील कोणतीही खुशाली या मंडळींना समजत नव्हती. मात्र आधुनिक काळात मोबाईलमुळे ही मंडळी एकदिवसआड आपल्या घरच्या मंडळींजवळ संपर्क साधून आपली खुशाली व मुक्कामाचे ठिकाण कळवतात. गेली अनेक वर्षे धनगर मंडळींची मुक्या प्राण्यांच्या चारापाण्यासाठीची शेकडो कि.मी.ची ही पायपीट आजही सुरू असून जवळपास पाच महिने शेकडो मेंढरांसह आपला कुटुंबकबिला घेऊन घराबाहेर राहात, भटकंती करणारा हा समाज नकळत अनेक बाबतीत सर्वांनाच अंतर्मुख करायला लावतो.
-जे. डी. पराडकर
jdparadkar@gmail.com
No comments:
Post a Comment