Wednesday, 2 April 2014

(04) बिरुबाच्या नावानं चांगभलं..

चपई नृत्य ही कोकणातल्या धनगरी समाजाची लोककला. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगरी समाज सणवाराच्या काळात या नृत्यात रमून जातो. ‘आ रं आ रं..’ म्हणजे ‘केवळ तुझीच भक्ती मला प्रिय’ अशी आर्त हाक देत, धनगर बांधव देवीच्या नृत्यात रंगून जातात.

उपजीविकेचं साधन शोधताना पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील धनगर समाज फिरत-फिरत येऊन कोकणात स्थिरावला. कोकणातल्या संस्कृतीशी एकरूप झाला. दळणवळणाच्या वाढत्या पर्यायांमध्येदेखील त्याचं मन मात्र गुरं आणि मेंढपाळी करण्यातच स्थिरावलं. अशिक्षितपणाचं बिरुद मिरवणा-या या धनगर समाजानं सणोत्सवात रंगत आणण्यासाठी ‘चपई नृत्य’ सादर केलं आणि कोकणातली एक आगळीवेगळी कला नावारूपाला आणली.

बिरुबा हे धनगर समाजाचं कुलदैवत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगरी समाज बिरुबाच्या नावानं दसरा, तुळशी विवाह, नवरात्री या सणाच्या दिवशी चपईनृत्य सादर करतात. तर कुडाळ तालुक्यात ‘गजा’ हे नृत्य सादर केलं जातं. या नृत्यप्रकारात केवळ पुरुषमंडळींचाच सहभाग असतो. पांढरं धोतर, पांढ-या रंगाचा झगा, त्यावर लाल रंगाचा कापडी पट्टा आढळतो. त्यांच्या या वेशभूषेची खासियत अशी की, तो संपूर्ण पोषाख पांढ-या रंगाचा असल्यानं लाल रंगाचं आखूड नक्षीकाम त्यावर शोभून दिसतं. पायात खुळखुळा असल्यानं नृत्य सादर करताना या खुळखुळ्यानं एक वेगळाच नाद निर्माण होतो.

डोक्यावरचा फेटा या वेशभूषेत एक वेगळाच बहर आणतो. विशेष म्हणजे कपाळी भंडारा लावलेला असतो. नृत्य सादर करणारे, हातात वेताची काठी घेऊन ढोलकी वाजविणा-यांभोवती फिरतात. ढोलक-याचा ढोल वाजू लागला की, नृत्याची सुरुवात होते. या नृत्यात कुठेही धांगडधिंगा आढळत नाही. ढोलाचा ताल जसा सरकेल तसे नृत्यप्रकारात बदल घडतात.

नृत्यकलाकार हातातील काठी हळुवार फिरवत, पायातला खुळखुळा वाजवत कसरती, उडय़ा मारत एका टोकापासून दुसरीकडे सरकतात. या हरकती करताना झग्याचं एक टोक हातानं पकडून गोल उडय़ा मारताना नृत्याची झलक काही औरच दिसते. बोल असतात..

बिरुबाच्या नावानं चांगभलं..
बाळू मामाच्या नावानं चांगभलं..
गज्जा बिरुबाच्या नावानं चांगभलं..
चंद्रासूर्या देवाच्या नावानं चांगभलं..
गज्जा शोबय वाकून चांगभलं..
दर्यासागर देवाच्या नावानं चांगभलं..
विठोबा बिरुजा देवाच्या नावानं चांगभलं..
तांब्याची व्याग्याच्या नावानं चांगभलं..

अशा गाण्याच्या ओळी गात हा नृत्यप्रकार रात्रभर चालतो. ताल धरत धरत नृत्याची गतीही वाढते. धनगरी पुरुष मंडळी मात्र भक्तीत तल्लीन होऊन चपई नृत्यात रंगून जातात.

No comments:

Post a Comment