Thursday, 3 April 2014

(21) मेंढी ते घोंगडी - एक खडतर प्रवास

माळा साफ करताना मला एक घोंगडी मिळाली आणी लक्षात आलं की काही वर्षांपूर्वी म्हशाचा बाजारातून (तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे)  गम्मत म्हणून मी ते घोंगड विकत घेतलवत. पूर्वी हायकिंगला जाताना रानावनात भटकणारे धनगर, शेळ्या, मेंढ्यांचे कळप घेउन जाताना दिसायचे, तेव्हांपासून मनात एक कुतूहल होत की मेंढी - लोकर ते घोंगडी हा सारा प्रवास कसा होत असेल ?

ठरवलं की मेंढी ते घोंगडी या प्रवासाचा मागोवा घ्ययचा. प्रथम एका धनगरी जथ्याबरोबर काही दिवस जायचं, ते राहतात, खातात, पितात, झोपतात तसंच त्यांच्यात मिसळून जाऊन स्वानुभव घ्यायचा. कोणताही पुस्तक वाचलं नाही, सिनेमा पहिला नाही कींवा इंटरनेटवरही शोध घेतला नाही. पूर्वी बर्यापैकी ट्रेकिंग, हायकिंग, रॉक क्लायंबिंग केलेअसल्यामुळेच मी ट्रेकिंगसाठी लागणारी उपकरणे म्हणजे तंबू, स्लीपिंग बेग, हेवर सेंक वगैरे उत्पादनाच्या व्यवसायात पडलो आहे. व्यवसायात पडल्यापासून वेळ नसल्यामुळे जास्त डोंगरात जाण जमत नव्हत ! हल्ली सराव खूप कमी होता!  प्रथम दररोज पांच किलोमीटर चालायला सुरवात केली, हळू हळू वाढवत दहा   किलोमीटरपर्यंत पोचलो. कमोडची सवय मोडण भाग होत ! तेही केलं. ओळख नसताना, पटकन कोणी धनगर मला त्यांच्याबरोबर राहून देतील याची खात्री नव्हती. जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर काही धनगरी जथ्यांना विचारून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मग एका मित्राचा ओळखीनी ओतूर (तालुका जुन्नर, जिल्हा पुणे)  या गावत ताजणे मास्तरांच्या ओळखिन धोंडीभाउ बिचकुले, धनगर यांच्याशी ओळख झाली. धोंडीभाउनि मला त्यांच्याबरोबर रहाण्याची परवानगी दिली.  हळू हळू असं लक्षात यायला लागलं की नगर जिल्ह्यात धनगर समाजाचे मुख्यतः दोन प्रमुख प्रवाह आहेत - हटकर आणी खुटेकर.  हटकर ही शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळून फिरणारी जमात. रुमालवाले, टोपीवाले आणी पागोटेवाले अश्या तीन वेगवेगळ्या पोषाख पद्धतींचे हटकर असतात. खुटेकर एका जागी राहून घोंगड्या विणण्याचे काम करतात. एक लाकडी खुटा जमिनीत गाडून त्याच्यावर हातमाग बांधला जातो आणी त्यावर घोंगड्या विणल्या जातात म्हणून त्यांना खुटेकर म्हणतात. येथील समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत, बिरोबा म्हणजे वीरभद्र. 

मला प्रथम 'हटकर' यांचे बरोबर अनुभव घ्ययचा होता. धोंडिभाऊ यांच्या 'वाड्यावर' माझा मुक्काम चालू झाला. दररोजच्या बदलत्या तळाला धनगर 'वाडा' असं म्हणतात.  धोंडीभाउ वय ६५ वर्ष, त्यांची पत्नी भाम्बाई, वय अंदाजे ५८ वर्ष, धोंडीभावोंचा धाकटा भाऊ, बाळू, वय आदमासे ५६ वर्ष,  धोंडीभावोंचा नातू सागर वय ४ वर्ष आणी १०० मेंढ्या, १५ शेळ्या, 2 गायी, 1 बैल, चार कोंबड्या आणी 2 कुत्री असं  हे एक भालमोठ्ठ एकत्र कुटुंब होत. पावसाळा सोडल्यास मुक्काम पूर्णपणे उघड्यावर !  त्यामुळे पहाटे पाच साडेपाचला जाग येते. जवळच्या विहिरीतून पाणी आणणे, शेळ्या बकर्यांचे दूध काढणे अशी नेहेमीची कामं झाल्यावर दोन ते तीन महिन्यांचा शेरडांना 'वाघुरातून' बाहेर काढण्याच मुख्य काम असत. 'वाघूर' म्हणजे टेनिस कोर्टवर असते तशी जाळी चारही बाजूंनी लावलेली असते आणी त्याच्यात शेळ्या, मेंढ्या कोंडल्या जातात. वाघुरात शिरून एक एक शेरडू पकडायचं म्हणजे कब्बड्डीचा एक डाव खेळण्याची मेहनत मला घ्यावी लागत होती. भाम्बाई म्हणत होती "सुनीलभाउ, सांभाळा, शेरडाची मांडी धरायची, प्वोट्री न्हाई !, प्वोट्री धरली तर तंगड तुटल ! "

शेतकऱ्याला उपयोगी नसणारी येड्याबाभळीची झाडं या भागात भरपूर, त्या झाडांच्या फांद्या कापून त्यांच्या  कोवळ्या पानांचा खास कोवळा चारा या वेगळ्या बाहेर काढलेल्या शेरडांना दिला जातो. काल जी मेंढी धड चरत नव्हती कींवा जिच्या चालण्यात खोड होती अश्या मेंढ्यांना बरोब्बर बाजूला काढून त्यांच्यावर इलाज केला जातो. बघता बघता धोंडिभाऊनि एका पिशवीतून सिरींज काढली आणी एका मेंढीला पटकन इंज्न्कस्न दिल, मी चाटच पडलो ! धनगर धोंडिभाऊ आता चक्क डॉक्टरच्या भूमिकेत होते !  एक मेंढी लंगडत होती, तिच्या गुढ्ग्याचे हाड बाहेर आले होते, प्रथम ते हाड सरळ केलं मग त्या  सांध्यावर खास वनौषधी लावून हिवराच्या झाडाची साल प्लास्टर म्हणून बांधलीगेली, बोनसेटर / धनगर धोंडिभाऊ ह्सत म्हणाले "काय करनार सुनीलभाऊ, समद कराया लागत" मी तोंडात बोट घालून ही त्यांची स्किल्स बघतच राहिलो ! तिसऱ्या दिवशी ती मेंढी व्यवस्थित चालायला लागलीवती ! बाळू, भाम्बाई अन धोंडिभाऊ आपल्या शंभर मेंढ्या रंग, शिंग, डोळे यांच्यावरून बरोब्बर ओळखतात. 'ढवळ कोल्ह बांड'  म्हणजे -- मुख्य रंग पांढरा / सफेद, आणी त्यावर कोल्ह्याच्या (मातकट) रंगाचे  पट्टे असलेलं मेंढरू. मेंढ्या एका जागी उभं राहून खाणारे प्राणी नव्हेत, त्यांना काटेरी झुडपं, गवत, खुरटी झाडं असं अन्न लागत आणी ते सहजपणे मिळत नाही त्यामुळे धनगराला मेंढ्या घेउन सतत फिरावं लागत. 

अख्खा कळप एकत्र ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, चुकून एखाद्या शेतकऱ्याच्या उभ्या पिकात मेंढ्या घुसल्या तर शेतकरी म्हणेल तेवढी नुकसान भरपाई द्यावी लागते !  पहिल्याच दिवशी काटेरी झुडपांमुळे माझे हात पाय चांगलेच सोलून निघाले,  कळप एका दिशेनी जावा म्हणून धावपळ करताना छाती फुलून येउ लागली,  त्यात मी स्वतःहून ' शेकाटां ' माझ्या खांद्यावर बाळगण्यासाठी हट्टानि मागून घेतला होता. 

शेकाटां म्हणजे  साधारण वीसएक फुट  लांब बांबू, की  ज्याच्या एका टोकाला आकडा असतो, त्या आकड्याच्या सहाय्यानी  झाडावरच्या शेंगा हलवून पाडायच्या की ज्या मेंढ्या खातात. दररोज पाच दहा किलोमीटर चालण्याच्या माझ्या शहरी 'फिटनेसची' किंमत शून्य झालीवती !  खर सांगयचं तर माझी हालत झालीवती !  आपल्या मेंढ्यांना कुठे कोणता आणी  चांगला चारा कसा मिळेल या बाबतीत धनगर अत्यंत जागरूक असतात, त्याकरता वनस्पती शास्त्राचा अभ्यास त्यांना असतो. सूर्य उतरणीला आला तसे धोंडिभाऊ आणि बाळू दोघांनी झाडाची पानं ओठावर धरून त्यांची पिपाणी करून  चिर्रर्र चिर्रर्र असे आवाज काढायला सुरवात केली आणि काय आश्चर्य त्यांच्या त्या  कॉल्स मुळे डोंगर चढावर असणऱ्या सर्व मेंढ्या गुमान उतरून परतीच्या मार्गाला लागल्या, आयला ! हा काय प्रकार आहे ? पार येड लागायचे पाळी आली ! मी त्या दोघांना त्या कॉल्स बद्दल विचारल तर ते म्हणाले " 

सुनीलभाऊ, मी काय फार शाळा शिकलो न्हाई पन पहिल्या दिशी म्याट्रिक व्होता येत का ?" माझा आवाज बंद ! रात्री भाकरी आणि भयंकर तिखट असे कालवण बरोबर कांदा आणि चार शेंगदाणे आणि चाळीस मिरच्या घातलेली चटणी  असं जेवण झालं. आमच्या अख्ख्या खान्दानानी एकत्र खाल्ल नसेल तेवढ तिखट त्या एका जेवणात होत, मी ठरवल होत की आपण ते रहातात खातात तसच करायचं, सांगतो कोणाला ? बिचकुले परिवाराच्या लक्षात आल की मला ते जेवण खूप तिखट लागतंय म्हणून. दुसर्या दिवसापासून माझ्यासाठी  'फिक्क' जेवण करायला सुरवात झाली. दोनचार दिवसात बर्याच नवीन गोष्टी लक्षात यायला लागल्या. धनगर, शेतकऱ्याच्या शेतात मेंढ्या बसवतात त्याला 'शेत रंगवणे' असं म्हणतात. य्हा सर्व्हिसचे हल्ली एका दिवसाचे  दोनशे रुपये मिळतात, पूर्वी बार्टर पद्धतीनी धान्य घ्यायचे. अक्ख शेत रंगवायच म्हणजे दररोज मुक्काम बदलण आलच. दररोज मुक्काम बदलायचा असल्यामुळे नेमकच समान बरोबर घ्याव लागत. पितळी हे एक छोटी परात असते, तिच्यातूनच चहा प्यायचा आणि जेवण पण जेवायचं. 

"कप अन बश्या आमास्नी झेपत न्हाईत " धोंडिभाऊ.  सतत आठ नऊ महिने दोनतीन घोड्यांच्या पाठीवरून दररोज संसार लादून फिरायचं म्हणजे खायची गोष्ट नाही !  मुंबईच्या डबेवाल्यांप्रमाणे यांच्या कडूनही शिकण्यासारख बरंच आहे. ' रिसोर्स मेनेजमेंट ' हा विषय तर हे लोक जगतात, तेंव्हां तो यांच्याकडूनच शिकला पाहिजे.  लोकर फक्त सात ते आठ रुपये किलो या दराने विकली जाते, तिच्या वाहतुकीचा खर्च यांना परवडत नाही, त्यामुळे लोकरीचे उत्पन्न न के बराबर !   शेरड, मेंढ्या बाजारात विकून येईल तेच मुख्य उत्पन्न. धोंडिभाऊ महिन्याला साधारण सात आठ हजार कमावतात. एक दिवस मी अन धोंडिभाऊ ' चाकण ' जिल्हा पुणे येथील खास मेंढ्यांचा आणि शेळ्यांचा बाजार भरतो तो बघायला गेलो. हा बाजार बघण म्हणजे एक फारच वेगळा अनुभव आहे. बिबट्या, लांडगे आणि तरस हे धनगरांचे मुख्य शत्रू ! दिवभर मरगळलेली दोन कुत्री रात्री झाडाचे पान पडलं तरी भुंकून राखण करतात. धोंडिभउंच शेत आहे पण नगर जिल्ह्यात फारसा पाऊस नसल्यामुळे  उत्पन्न काहीच नाही. जुलै महिन्यात आपल्या गावी जायचं आणि दिवाळीच्या दरम्यानी आपला गाव सोडून पुढचे आठ नऊ महिने मेंढ्या वळत फिरत रहायचं. बर्याच हटकर मंडळींकडे रेशन कार्ड सुद्धा नाहीये ! 

लाटकण, कुरहाड, बेचकी, लोकर कापायची कात्री अश्या पूर्वापार चालत आलेल्या हत्यारांखेरीज कोणतेही स्वयंचलित यंत्र हे लोक  वापरताना मला दिसले नाहीत, अरे हो ! नाही म्हणायला मोबाईल फोन मात्र आहे. धोंडिभाऊ : " य्हो म्वोबिल नवताना तवा गावी म्येलेल मानूस सहा सात महीन कळायचा न्हाई बघा ! ".  पंखा, टीव्ही, मायक्रोवेव, गिझर यांच्याशिवाय माणूस कसा जगू शकेल ? या माझ्या प्रश्नाला धोंडिभाऊनच उत्तर होत "  लई मजेत ". खरच, या सर्व दीडशे जणांच्या एकत्र कुटुंबाला घेउन फिरण्याचा रामरगाडा घालणारे  धोंडिभाऊ आणि भाम्बाई माला कधीच दुख्खी दिसले नाहीत. त्यांच्यात आत आणि बाहेर काही वेगळ  नाही.  आलेल्या संकटाला खुल्या दिलाने सामोर जायचं आणि आपल दुख्ख उगाळत बसायचं नाही हे त्यांच्या आयुष्याच गमक माला कळल.

शेवटच्या दिवशी धोंडीभावोंनी माला सरप्राइज भेट द्यायची ठरवली. धोतर, पागोट, शाल, नेहेरू शर्ट आणून माला पूर्ण सजवला. नंतर गावत गेल्यावर असं कळल की माला जे कपडे आणले होते ते उधारीवर आणले होते ! म्हंटल हे धनगर "धनाचे आगर" तर आहेतच शिवाय  मनगर  "मनाचे, दिलाचे आगर पण आहेत "  त्यांच्या वाड्यावरून निघताना भाम्बाई माला "शिदोरी" द्यायला विसरली नाही, ती प्रेमाची शिदोरी घेत असताना पटकन तोंड वळवून शर्टाच्या बाहीला मी अश्रू पुसले.

काही दिवस हटकर धोंडिभाऊ यांच्याबरोबर राहिल्यानंतर आता माला खुटेकर धनगारांबरोबर रहायचं होत. इस्माईल नावाचे घोंगडी व्यापारी माला भेटले त्यांनी माला गांव खांबा, तालुका संगमनेर, जिल्हा नगर येथे पाठवल.  खांबा हे अख्ख गांव खुटेकर धनगरांच आहे. बाजीराव शेंडगे यांच्याशी माझी ओळख झाली. बाजीरावांचा हातमाग आहे त्यांचा पिढीजात धंदा घोंगड्या विणण्याचा. धोंडिभाऊकडून आणलेली लोकर मी बाजीरावांना दिली. गावातच एका यंत्रावर ती लोकर पिंजून घेतली. सर्वसाधारणपणे घरातील स्त्रिया या लोकरीपासून चरख्यावर सूत काततात. मीही थोडावेळ सूत कातायचा प्रयत्न केला पण व्यर्थ ! एकतर सतत धागा तुटत होता कींवा लोकरीचा गोळा हातातून पडत होता, माझी त्रेधातिरपीट बघून गावातील स्त्रिया तोंडावर पदर धरून हसत होत्या. तयार झालेलं सूत वेगवगळ्या रंगात भिजवून ठेवल जात, म्हणजे रंग पक्का बसतो. चिंचोक्यांच कूट करून त्याची पेज केलीजाते. दुसर्या दिवशी ते रंगवलेले धागे त्या चीन्चोक्याच्या पेजेत भिजवायचे, म्हणजे विणताना ते तुटत नाहीत. हे धागे वाळले की त्यातले दोनशेसाठ धागे हातमागावर उभे ताणून बांधायचे. मग मात्र त्या उभ्या धाग्यान्मधून आडवे धागे विणायचे अत्यंत जिकीरीचे आणि चिकाटीचे काम सुरु होते. सबंध दिवसभर मान मोडून काम केल्यावर कुठे जेमतेम दोन घोंगड्या बनतात ! व्यापारी जागेवरच येउन एका घोंगडीला दोनशे ते अडीचशे रुपये देतात.एका घोंगडीला लोकर, रंग, चिंचोके असं मिळून साधारण खर्च अंदाजे शंभर रुपये येतो, म्हणजे काम केलं तर दिवसाला अडीचशे ते तीनशे रुपयांची कमाई. कारखान्यात तयार झालेली अनेक ब्लेनकेट्स सध्या बाजारात आली आहेत त्यांच्याशी स्पर्धा करत खुटेकर टिकायचा प्रयत्न करतायत. संपूर्णपणे हातानी बनवलेली आणि पूर्णपणे लोकरीची अशी टिकाऊ घोंगडी मात्र येथेच बनवली जाते.  

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला मेंढी ते घोंगडी हा माझा प्रवास आता संपला होता. बाजीरावंकडून निघताना, शहरी रिवाजाप्रमाणे, गावात सर्वांना कळेल असे बघून माझ्या कारखान्यात बनवलेले वेस्ट पाऊच मी बाजीरावांच्या मुलांना प्रेझेंट केले आणि त्यांचा निरोप घेउन ठाण्याला परात आलो. घरी आल्यावर गाडीतून समान काढताना एक घोंगडी दिसली, तसा लगेच बाजीरावांना फोन केला तेंव्हां कळल की खास कारीगिरी करून वेगळ्या डिझाईनची ती घोंगडी त्यांनी गुपचूप भेट म्हणून माझ्या गाडीत ठेवून दिली होती. 

आयुष्यभर काबाडकष्ट करून इमानदारीनी वागलेल्या बाजीरावांच्या हातानी बनवलेल्या त्या मायेच्या घोंगडीच्या उबेची सर सोन्याची झालर असलेल्या पश्मीना शालीला पण येणार नाही !

सुनील  मुकुंद जोशी 

No comments:

Post a Comment