धनगराने पाळलेल्या कोल्ह्यांच्या पिल्लांनी त्याच्याच मेंढ्यांचा घोट घेतला. धनगराने कोल्ह्यांना पळवून लावले. ती पळून गेल्यावर हताश झालेला धनगर स्वत:शीच पुटपुटला, आंजारली गोंजारली तरी आपल्याच जातीवरच गेली.
एका गावात एक दयाळू धनगर राहायचा. कुणी संकटात असलं की, त्याला अजिबात राहावयाचं नाही. तो लगेच त्याला मदत करायला धावायचा. आपल्याकडे असेल-नसेल ते द्यायचा. त्याच्या या स्वभावामुळे गावात तो खूप प्रसिद्ध होता. एकदा तो कामानिमित्त दुस-या गावात चालला होता. गाव बरंच लांब असल्याने त्याने आपल्याबरोबर चटणी-भाकरही बांधून घेतली होती. या गावाला जाताना वाटेत मध्येच जंगल लागत असे. पण हा रस्ता धनगरासाठी नेहमीचाच असल्याने त्याला जंगलाची भीती नव्हती. त्यामुळे तो नेहमीप्रमाणं गाणं गुणगुणत आरामात चालला होता. काही अंतर चालून गेल्यावर थोडा आराम करावा म्हणून तो एका मोठय़ा झाडापाशी थांबला. इतक्यात त्याला कुणाचं तरी ओरडणं ऐकू आलं. या दाट जंगलात कोण ओरडतंय, हे पाहायला म्हणून तो इकडेतिकडे बघू लागला. पण त्याला कुणी दिसेना. अखेरीस तो जागेवरून उठला आणि पाहतो तर थोडय़ा लांबवर लांडग्याची दोन पिलं त्याला दिसली. या पिलांजवळ त्याची आई नव्हती. त्यामुळे ती कावरीबावरी झाली होती. आईच्या आठवणीने रडत होती. मातीत गडाबडा लोळत होती. भुकेने जोरजोराने ओरडत होती. धनगराला त्यांची दया आली. ‘यांची आई कुठं बरं गेली असेल?’ असं त्याच्या मनात आलं. त्याने आजूबाजूला काही अंतरापर्यंत त्यांच्या आईचा शोधही घेतला. पण ती त्याला कुठे दिसली नाही. आता आपल्यालाच या पिलांची मदत करायला हवी, असा विचार करून त्याने पिलांना हलकेच उचललं आणि त्यांना गोंजारलं. पिलांनाही त्याच्या उबदार स्पर्शाने बरं वाटलं. धनगराने आपल्याकडील भाकरी काढून या पिलांना खायला दिली. ती खाऊन त्यांना हुशारी आली. त्यांनी ओरडणं-रडणं सोडून दिलं. ती धनगराबरोबर मजेत खेळू लागली. थोड्याच वेळाच धनगराला त्यांचा चांगलाच लळा लागला, पण त्याला तर दुस-या गावाला जायचं होतं. आता पिलांना पुन्हा जंगलात सोडलं तर आईविना पुन्हा त्यांची बिकट अवस्था होणार. त्यांना सोडून जाणं धनगराला जिवावर आलं. शेवटी त्याने दुस-या गावी जाण्याचा बेत रद्द केला आणि दोन्ही पिलांना उचलून घरची वाट धरली.
गावात परतताना धनगराच्या हातात लांडग्याची पिलं पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. ‘ कुठून आणली ही पिलं?’ असं प्रत्येक जण त्याला विचारू लागला. तेव्हा धनगराने त्यांना सगळी हकिगत सांगितली. ‘आता या पिलांचं काय करणार?’ असं लोकांनी त्याला विचारलं. धनगराने त्यांना ‘ती मी पाळणार’, असं पिलांना गोंजारत गोंजारतच सांगितलं. ‘अरे, येडा का खुळा? लांडग्याची पोरं कुणी पाळतं का?’ धनगराच्या दयाळूपणावर हसावं की, रडावं ते लोकांना कळेना. त्यांनी धनगराला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण धनगराने कुणाचंच ऐकलं नाही. तो लांडग्यांच्या पिलांना घरी घेऊन आला.
घरी आणल्यावर धनगराने त्यांना प्रेमाने वाढवायला सुरुवात केली. तो त्यांना चांगलंचुंगलं खायला घालायचा. त्यांना हवं नको ते बघायचा. धनगराकडे ब-याच मेंढय़ा होत्या. त्यांच्या कळपात त्याने लांडग्यांच्या पिलांना वाढवलं. लांडग्याची पिलं मेंढय़ांबरोबर खेळायची. चांगल्या पालनपोषणामुळे ती लवकरच धष्टपुष्ट झाली. धनगराचं त्यांच्यावरील प्रेम मात्र कमी झालं नव्हतं. त्यामुळे तो त्यांना बेधडक मेंढय़ाच्या कळपात सोडायचा. पण मोठी झालेली लांडग्याची पिलं हळूहळू आपलं खरं रूप दाखवू लागली. मेंढ्यांना ती घाबरवून सोडू लागली. बिचा-या मेंढय़ा लांडग्याच्या पिलाच्या ताकदीपुढे काहीच करू शकत नव्हत्या. त्यामुळे लांडग्यांच्या पिलांना आणखी माज चढू लागला. ती उठसूठ मेंढ्यांना सतावू लागली. धनगराला याचा पत्ताच नव्हता.
अखेरीस जे घडू नये ते घडलं. एके दिवशी धनगर घरात निवांत बसला असताना मेंढ्यांच्या कळपातून एकाएकी ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने धावतच बाहेर येऊन पाहिलं तर मेंढय़ा जिवाच्या आकांताने ओरडत होत्या. लांडग्याच्या पिलांनी दोन मेंढय़ांच्या नरडीचा घोट घेतला होता. ते पाहून धनगर हादरलाच. त्याला लांडग्यांचा खूप राग आला. आपण लाडाने खाऊ-पिऊ घातलेली लांडग्याची पिलं मोठी झाल्यावर आपल्याच मेंढय़ांच्या जिवाचा घास घेतील, असं त्याला वाटलं नव्हतं. पण लांडग्याची पिलं लांडग्याच्याच जातीवर गेली. त्याचा दयाळूपणा त्याला चांगलाच महागात पडला होता. त्याने घरातून काठी आणली आणि लांडग्यांच्या पिलांना बदडून काढायला सुरुवात केली. त्यांना मारताना तो सारखा चरफडत होता की, ‘तुम्हाला इतक्या प्रेमाने वाढवलं तरी तुम्ही माझाच घात केलात.’ त्याचा रुद्रावतार पाहून लांडग्याच्या पिलांना आता आपलं काही खरं नाही, हे लक्षात आलं आणि त्यांनी तिथून पळ काढला.
ती पळून गेल्यावर हताश झालेला धनगर स्वत:शीच पुटपुटला, आंजारली गोंजारली तरी आपल्याच जातीवरच गेली.
(इसापनीतीवर आधारित)
http://prahaar.in/chottam-mottam/5394
No comments:
Post a Comment