Sunday, 6 April 2014

(29) बेळगावचा धनगर निघाला नैरोबीला

पशुंच्या आरोग्यावरील संशोधनाची युनोकडून दखल

२१ जानेवारी २०१३ च्या 'महाराष्ट्र टाइम्स' मधून...


बेळगावमधल्या उचगाव या खेड्यात शेळामेंढ्या हाकणाऱ्या निळकंठमामा नागप्पा कुरबूर या ७५ वर्षांच्या धनगराने पशुंच्या आरोग्यावर केलेल्या संशोधनाची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली आहे. मंगळवारपासून तीन दिवस नैरोबीत होणाऱ्या जागतिक पातळीवरील परिसंवादात केवळ तिसरीपर्यंत शिकलेले निळकंठमामा भारतीय पशुधनाचे आरोग्य व संवर्धन या विषयावर अनुभवातून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा खजिना जगभरातील पशुवैद्यकांसमोर खुला करणार आहेत. 

निळकंठमामांचा आतापर्यंतची वाटचाल थक्क करणारा आहे. १९५०च्या सुमारास इयत्ता तिसरीतच शिक्षणाला रामराम ठोकून ते पारंपरिक शेळी-मेंढी पालनाच्या व्यवसायाकडे वळले. एखादा रोग आला तर शेळ्या-मेंढ्या नजरेसमोर मृत्युमुखी पडत होत्या. त्यांच्या आजारावर जंगलातील झाडपाल्याचे औषध व जनावराला गरम लोखंडी सळ्यांनी डागणी दिली जात होती. पण , शेतात रासायनिक खतांचा वापर वाढत गेला त्याचबरोबर रसायनातून जनावरांना नवीन रोग जडण्यास सुरवात झाली. जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले. रोगग्रस्त जनावरांच्या मांस व दुधातून माणसांनाही धोका होण्याची भीती होती. त्यामुळे जनावरांना वाचवण्यासाठी निळकंठमामा यांनी १९८४च्या काळात स्वतःच्या शेळ्यामेंढ्यांना जंताचे औषध देण्यास सुरवात केली. त्याचा फायदा दिसू लागला. जनावरे धष्टपुष्ट झाली. निळकंठमामांची जनावरे बघण्यासाठी गाव लोटला. मग गावकऱ्यांनीही जनावरांना जंताचे औषध देण्यास सुरवात केली. 

काही दिवसांनी या औषधांना गुण येईनासा झाला. औषधांच्या जादा मात्रेमुळे जनावरांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे निळकंठमामांच्या लक्षात आले. त्यांनी औषधांचा वापर कमी केला. त्यांच्या या प्रयत्नांनाही यश आले. शेतकऱ्यांनी संकरित जातींऐवजी देशी जनावरे पाळल्यास त्यांचे अधिक चांगल्या प्रकारे संवर्धन करता येते असे त्यांच्या लक्षात आले. कारण देशी जनावरे भारतातल्या हवामानाला सरावलेली असतात. हे सर्व करीत असताना त्यांनी जनजागरण स्वयंसेवी संस्था , जागृत कुरबूर सहकार संघ व मिथान संस्थेसोबत देशभरात जनावराच्या आरोग्याबाबत प्रचार व प्रसार करण्यास सुरवात केली. अखेर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अॅनिमल प्रॉडक्ट अँड हेल्थ डिव्हिजनने त्यांच्या कार्याची भर घेतली.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow/18108357.cms?

Friday, 4 April 2014

(28) बॅरिस्टर टी. के. शेंडगे

शांत, संयमी, कर्मयोगी - बॅरिस्टर टी. के. शेंडगे

बॅरिस्टर टी. के. शेंडगे यांचा जन्म पेड ता. तासगाव येथे २५ मार्च १९१७ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहान वयातच आपण काहीतरी वेगळे करुन दाखवायचे ही जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या तेराव्या वर्षी ते शाळेत दाखल झाले. आपल्या मुलाची ही शैक्षणिक आवड त्यांचे वडिलांचे लक्षात आली व याला नामवंत वकील करावयाचे हे त्यांनी बोलून दाखवले. हेच ध्येय घेऊन "आपण गांधी, नेहरू सारखे  बॅरिस्टर" बनायचा ध्यास त्यांनी घेतला व तो त्यांनी पूर्ण केला. प्राथमिक शिक्षण पेड येथे, माध्यमिक कोल्हापूर येथे व कॉलेजचे शिक्षण कोल्हापूर व बेळगाव या ठिकाणी झाले.कोल्हापूरात राजाराम कॉलेज या विख्यात कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना कुस्ती या विभागात विद्यापीठाची जनरल चँपियनशिप मिळाली. पोहणे या खेळातही त्यांचे प्राविण्य होते. भरदार बांधेसुद शरीरयष्टीमुळे ते चटकन सगळयांना नजरेत भरत असत. बॅरि. पी.जी., बॅरि. बाबासाहेब भोसले, बॅरि. बागवान, क्रांतिवीर नागनाथ अण्णा, शिवाजीराव भोसले यांची भेट व मित्रत्वाचे संबंध शाहू बोर्डिंग हाऊस कोल्हापूर येथेच आला. या मित्रपरिवाराने उच्च पदवी मिळवण्याचा ध्यासच घेतला. वसतिगृहाने त्यांना संस्कार दिले, कमवा व शिका, हा संदेश दिला व स्वावलंबन हा मंत्र दिला. या मंत्राच्या जोरावर त्यांनी लंडनला जायचा निश्चय केला.

बॅरिस्टर शेंडगे साहेबांची आर्थिक परिस्थिती बेताची होती शिवाय लंडनमध्ये राहायचे म्हणजे खर्चाचे हे कोडे कसे सोडवायचे हो प्रश्न होता. धनगर समाजातील एक मुलगा लंडनला जाण्याचे स्वप्न पाहतोय ही बातमी समाजबांधवांमध्ये पसरली व शेकडो मदतीचे हात पुढे आले. त्यामध्ये मुंबईला उपजीविकेसाठी गेलेला कामगार वर्ग हा मोठय़ा प्रमाणात पुढे आला. २ रु. पासून त्यावेळी १०० रुपयांपर्यंत मदत, समाजबांधव व शिक्षण प्रेमी यांचेकडून झाली व लंडनला जावयाची तयारी झाली. या मदतीमध्ये आटपाडी, माण, जत, तासगाव तालुक्यातील लोकांनी आघाडी घेतली. प्रवासखर्च रु. १७०० व ३ महिने लंडनमध्ये राहायचा खर्च अशा मदतरुपाने जमा झाला.

त्यावेळी विमानप्रवासासाठी खूप खर्च येत असे. सन १९५० रोजी बोटीने जाण्याचे ठरले. त्यांनी भारत सोडला बोटीला प्रवास १७ दिवसांचा होता. सर्व थरातील समाजबांधव मुंबईस नोरोप देण्यासाठी जमा झाले होते. या सामान्य माणसांच्या भावना पाठीशी घेऊन मी लंडनला जातोय. त्यांच्या ऋणाची उतराई मला करावयाची आहे. बॅरिस्टर बनून त्यांच्यासाठी काहीतरी करावयाचे हा निश्चय त्यांनी डेकवरच झाल्याचे अनेकवेळा बोलून दाखविले. लंडनमध्ये काही दिवस इंडिया हाऊसमध्ये राहिले व नंतर एका इंग्रजी कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून राहिले. बॅरिस्टरच्या कोर्सला ऍडमिशन घेतले. कोर्स तसा अवघड होता. पूर्णवेळ देऊन शिकणे महत्वाचे होते. थोडय़ाच दिवसात जवळपासची पुंजी संपली आता काय करावयाचे हा प्रश्न पडला. बॅरिस्टर साहेबांना तीन बंधू, त्यापैकी दोन प्राथमिक शिक्षक व एक शेती करत होते. प्राथमिक शिक्षकाचा पगार अत्यंत अल्प त्यातूनच ते थोडेफार पैसे पाठवीत समाजातील लोकही सुरुवातीस थोडी मदत देत तथापि ६ महिन्यानंतर हे थांबले अजून तीन वर्षे काढायची होती. आणि म्हणून साहेबांनी 'स्वावलंबन' व 'कमवा व शिका', या तत्वाचे खऱया अर्थाने आचरण करायचे ठरविले. ते आठवणी सांगताना म्हणायचे 'मला कोणतेही काम करण्याची आवड होती. कोणतेही काम हलके वाटत नसे म्हणून प्रसंगी मी फळांच्या बागेत कष्टाचे काम केले व अर्थार्जन केले'. एक वर्ष मिळवण्यासाठी खर्च करावयाचे व मिळवलेले पैसे घेऊन पुन: दुसरे वर्ष शिकण्यासाठी असा क्रम ठरला त्यामुळे या कोर्सला त्यांना ७ वर्षे घालावावी लागली. पण कोर्स पूर्ण करुनच गावी जायचे हा निर्धार ! त्यामुळे अनेक संकटे कुटुंबावर आली. पितृछत्र हरपले जवळच्या नात्यातील माणसे गेली. तथापि त्यांचा निर्धार तसुभर कमी झाला नाही. १९५८ ला ते बॅरिस्टर झाले व पुन: अर्थार्जन करुन भारतात आक्टोबर १९५९ ला परत आले जंगी स्वागत मुंबईला झाले या कालावधीत एक आठवण सांगताना ते म्हणत होते, "कर्मवीर भाऊराव पाटील यांचे एक पत्र आले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, तुकाराम, तू अडचणीत असशील पैसे हवे असल्यास कळव, त्यांना पत्राचे उत्तर दिले, अण्णा स्वावलंबन व कमवा शिका हे मंत्र तुम्ही आम्हाला दिले तर त्याचा वापर आम्ही प्रत्यक्षात न करता तुमच्या मदतीवर अवलंबून राहिला तर तो तुम्ही दिलेल्या संस्कारांचा पराभव होईल. अण्णा, तुमचा आशीर्वाद पाठिशी असू द्या, तेवढे पुरे मी भारतात आल्यावर तुमची भेट घेण्यास येईन". तथापि कर्मवीरांचे निधन १९५९ ला झाले व त्यांना भेटण्याचे स्वप्न अधुरे राहिले. पण ज्यावेळी ते परत आले ते तडक साताऱयाला गेले. बॅरि. पी.जी. पाटील यांना भेटले व आण्णांचे समाधी स्थळावर जाऊन कितीतरी वेळ मूकपणे अश्रू ढाळले. ही त्या दोघांची अण्णांना श्रद्धांजली होती अण्णा, तुमचे कार्य आम्ही पुढे नेऊ हाच निर्धार परत एकदा त्यांनी केला. बॅरि. पी. जी., शिवाजी कॉलेजचे प्राचार्य होते त्यांनी शेंडगेसाहेबांना कॉलेजमध्ये नेऊन मोठा सत्कार केला व म्हणाले हाच तो कर्मवीरांचा संदेश स्वत: आचरणात आणणारा पेडचा तुकाराम शेंडगे.

याच काळात धनगर समाजोन्नती मंडळाची स्थापना करुन स्व. यशवंतराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली एक परिषद सांगली येथे घेणेत आली. बॅरि. साहेबांनी त्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यामुळे समाजात जागृतीचे वारे वाहू लागले आपणास खंबीर नेता मिळाला याचा आनंद सर्वांना झाला व माणसांचे मोहोळ या व्यक्तीभोवती आले. रत्नपारखी यशवंतराव चव्हाणांच्या नजरेतून हे सुटले नाही. त्यांनी बॅरिस्टर साहेबांना राजकारणात ओढले व 'जत' या सांगली जिह्यातील मतदार संघातून काँग्रेसतर्फे उभे केले व १९६२ साली साहेब जतमधून प्रचंड मताधिक्याने निवडून आले, आमदार झाले. त्यामुळे त्यांचा वकिलीच्या व्यवसायामध्ये खंड पडला. १९६२ ते १९६७ या काळात विधानसभेत त्यांनी शेतकऱयांना अनेक प्रश्नांना वाचा फोडली. दुष्काळी भागातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या काळात साहेबांची वाढणारी लोकप्रियता ही काही मंडळीना आवडली नाही. तसेच साहेब हे आपल्या राजकीय प्रवाहाचे साथीदार नाहीत ही जाणीव काहींना झाली व पुढच्या विधानसभेत हा पत्ता कसा काटायचा याचे डावपेच झाले. व १९६७ च्या विधानसभेत त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारले येथेच साहेबांना परावभ स्वीकारावा लागला. येथेच साहेबांचे राजकारण संपले.

- प्राचार्य आर. एस. चोपडे
http://www.mysangli.com/images/swfs/smaranika/tk_shendge.swf

(27) माणसांहून मेंढरं लई लई शहाणी हो

सुंबरान मांडील गा बिरुबा या देवाच
धरणी आई मातेच गा सुर्य देव पित्याच
बिरुबा देव सांगतो घ्या की तुम्ही ध्यानी हो
अन माणसांहून मेंढरं लई लई शहाणी हो ।।१।।

कुणी लोटी अंगण कुणी टाकी सडा हो
आरशावाणी निर्मळ धनगराचा वाडा हो
मेंढराला कुरवाळीत गाई कुणी गाणी हो
आणि माणसांहून मेंढरं लई लई शहाणी हो ।।२।।

रात-दिस डोळ्या म्होरं आमची हो लेकरं
पोरांवानी थोर आम्हां हायेती गा मेंढरं
बिरूदेव पाठीराखा येई रानोरानी हो
आणि माणसांहून मेंढरं लई लई शहाणी हो ।।३।।

नाचत्याती धनगर हालत्याती रुमाल
ढोलासंग कैताळ करतुया कमाल
भंडाऱ्यान माखला बिरू सोन्यावाणी हो
आणि माणसांहून मेंढरं लई लई शहाणी हो ।।४।।

चित्रपट - दिशा प्रोडक्शन निर्मित 'लगीन माझ्या खंडोबाचं' (२००९)
ह्या गीताचा व्हिडीओ पाहण्यासाठीची लिंक - http://www.youtube.com/watch?v=hBHBMdFRYf8&hd=1

Thursday, 3 April 2014

(26) चपय नृत्य

लोककला हा कोकणचा आत्मा आहे. लोककलेशिवाय कोकणची लोकसंस्कृती परिपूर्ण होत नाही. वेगवेगळ्या समाजाने लोकनृत्याचा हा वारसा जपला आहे. सिंधुदुर्गातील धनगर समाजही त्यापासून दूर नाही. ‘चपय नृत्य’ म्हणजे धनगर समाजाची एक ओळख आहे. बेभान होऊन केलेला नाच, उच्च स्वरातील देवाची आळवणी आणि मानवी थर रचून सादर केलेला कलाविष्कार हे सारं थक्क करणारं असतं. ढोल, घुमट, डफ, झांज, याती, सनई या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर आणि पायामधील वाक्या घुंगरांच्या कान प्रसन्न करणार्‍या नादात धनगर बांधवांनी सादर केलेली एकापेक्षा एक सुरेख नृत्यं डोळ्यांचे पारणं फेडतात.

निसर्गाने नटलेला आणि लाल मातीचा सुगंध लाभलेला कोकण हा मुळातच लोकपरंपरांचा प्रदेश. या प्रदेशात रायगडापासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत धनगर समाजाचं वास्तव्य आहे. एवढंच नव्हे; तर या समाजाने बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणातही आपली लोककला जिवंत ठेवली आहे. कोकणातील मंडळी देवभोळी आणि श्रद्धाळू समजली जातात. कोणतेही शुभ कार्य हाती घ्यायचं असेल तर पहिलं निमंत्रण देवाला देण्याची प्रथा कोकणात आहे. ‘आई म्हालची पांढर’ हे धनगर समाजाचं कुलदैवत आहे. धनगर समाज हा विशेषत: डोंगराळ भागात आढळतो. अगदी प्राचीन काळापासून सुरू असलेल्या रूढी-परंपरा धनगर समाजाने आजही जिवंत ठेवली आहेत. कोकणातील धनगर समाजाचे ‘चपय नृत्य’ तर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. संस्कृती, परंपरा या ईश्वरी भक्तीशी निगडित असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचीच नाळ तशी लोककलेशी जोडलेली आहे. मानवी जीवनशैली बदलूनही लोककलेवरची श्रद्धा काही संपलेली नाही. दर्‍याखोर्‍यांतील, ग्रामीण भागातील एक लोककला असलेलं चपय नृत्य म्हणजे धनगर समाजाची एक ओळख आहे. ‘आई, म्हालची पंढरीच्या नावानं’, ‘विणे बीरोबाच्या नावानं’, ‘जान्या नवलाईच्या नावानं’, ‘पंढरपूरच्या पयाच्या नावानं’, ‘इंजापद्माताईच्या नावानं’, ‘जेजुरीच्या खंडोबाच्या नावानं’, ‘आठवलची केदाईच्या नावानं’, ‘कोल्हापूरची अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ अशा घोषणांनी सगळा आसमंत व्यापून राहतो. जयघोषात जागर चालू होतो. बेभान होऊन केलेला नाच, उच्च सुरातली आळवणी आणि मानवी थर रचून सादर केलेला कलाविष्कार हे सारं काही थक्क करणारं असतं. ढोल, घुमट, डफ, झांज, याती, सनई या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर तसंच पायामधील वाक्या घुंगरां (चाळ)च्या कान प्रसन्न करणार्‍या नादात धनगर बांधवांनी सादर केलेली एकापेक्षा एक सुरेख नृत्यं डोळ्यांची पारणं फेडतात. परंपरेतून नटलेला हा सांस्कृतिक ठेवा चपय नृत्याच्या रूपाने धनगर समाजाने अजूनही जतन केला आहे.

होळी, गुढीपाडवा, कुलदैवताच्या जत्रेला धनगर समाज पारंपरिक पोशाख परिधान करून ओव्या गातो. किमान २४ जणांचा समावेश असलेला काठीवरचा समूहनाच, झांगळी, बाल्या, दिंडी, लावणी, शब्दवेध, संगीत, पोवाडा अशी ‘धनगरी गजा’ नावाने ओळखली जाणारी अनेक नृत्यं सादर केली जातात. ढोल वाजवत ‘हर हर चोभला’ आणि ‘गण’ म्हटले जातात. धनगरी भाषा आणि ढोल हा नृत्याचा प्राण असतो. कुलदैवताबरोबर मातृभूमीचं आणि जन्मदात्याचं सुमरान (स्मरण) केलं जातं. धनगरांच्या यात्रेच्या दिवशी सोनं लुटताना, गार्‍हाणं घालताना खूप धम्माल येते. या वेळी सर्व समाजबांधव एकमेकांना सोनं (आपट्याची पानं) देऊन आलिंगन देतात. ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे रहा’ असा संदेश त्यामागे असतो. शेवटी गार्‍हाणं होतं. हे गार्‍हाणं घालणं म्हणजे देवाला केलेली एक प्रकारची विनंतीच असते. गार्‍हाणं घालताना प्रसंगी विविध भक्तगणांनी आपल्या हातून देवीची सेवा करताना त्यामध्ये कळत नकळत काही चूक झाली असेल तर गार्‍हाण्यातून त्याची क्षमायाचना केली. यात अनुभवाचा आणि मानपानाचाही प्रकार असतो. गार्‍हाणं घालायला सुरुवात झाल्यावर मानकर्‍यांच्या पाठोपाठ उर्वरित गाव साथ द्यायला सुरुवात करतो.

गार्‍हाणं घालायची विशिष्ट पद्धत असते. ‘‘आई म्हालच्या पंढरीच्या नावाने चांगभलं, आताळी गेल्या दाल्या पाताळी गेल्या मुळ्या, चांद सूर्याचे खांद धरतीमातेचे वर, गाईच्या गोठ्यात आई आज तू सुंजान, आताळात आणि पाताळात नजर तुझी पोहोचते, वसाची काही पोहोचत नाही, काय तुझा अपराध झाला असेल, तर तो मखलास करावा. आज निर निर्वशी मरून गेल्यात, आज त्यांना बाराच्या फळावर राजी करावं, आज कोणी तुमची सुवासिनी मरून गेल्यात, त्यांना बाराच्या पिंजरीच्या मानावर राजी करावं, आज इतरा-पितरा मरून गेल्यात, त्यांना भरल्या फळावर राजी करावं. आज वसाची दोन शेरडा हाता, दोन गुरा हाता, दोन लेकरा हाता, त्यांचा संभाळ करावा, हातात काठी घेई येतीची, कोळापकर शिंप्याचा, दिसाचं कर चार, रात्रीचं कर पार, आई आसाची अशीच वर्षाच्या वर्षा अशीच तुझी सेवाचाकरी वसाकडून करून घे, आज तुझी लेकरा बाळा बाहेर-भुतूर राहतात, त्यांचा सांभाळ करावा, आई आज त्यांना शेरास सव्वा शेर मिळवून द्यावा. आज तुला हातापोटीचा नारळ दिला, तो मान्य करून घ्यावा. काही साडेसाती असल, चेष्टापिडा असल तर ती पायाखाली घालून घे. जिथं लेकरू जाईल, तिथं यशाचा वाटा घालून दे आई, कोणत्या तरी तर्‍हेचा आड मेळा आला तर त्याचा सांभाळ करावा. आई, म्हालची पंढरीचा मान करून घे आई, म्हालची पंढरीच्या नावानं चांगभलं..!’’ असं बोलून गार्‍हाणं घातलं जातं.

आज परिस्थिती बदललीय. धनगर समाजातही आधुनिकतेचे वारे वाहू लागलेय. मात्र धनगरांच्या जत्रा-उत्सवांतून आजही अशी गार्‍हाणी घातली जातात. आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना या समाजाने लोकपरंपरेशी आपली नाळ अजूनही कायम ठेवली आहे. संस्कृती टिकवण्यातलं त्यांचं हे योगदान महत्त्वाचं आहे.

- लाडोजी परब
http://www.navprabha.com/navprabha/node/4270

(25) चित्रकार गुरव यांचे 'सुंबरान'

'त्रकलेतील रावसाहेब' आणि 'कलामंदिराचे गुरव' असे विशेषण ज्यांना लागू होते, अशा अभिनव कला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक रावसाहेब गुरव. त्यांचे कलाक्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनात खरी पारंपारिकता आणि संस्कृती रुजलेली आहे. त्याच एक दृष्य… म्हणजे चित्रकार गुरव यांचे 'सुंबरान'…!!

विशेषतः लहानपणापासून आपण रेडिओवर, लोकगीतांमध्ये ‘धनगरी ओव्या’ ऐकल्या आलोय. ज्यांना आपल्या सांस्कृतिकतेबद्दल आत्मीयता आहे अशा सर्वांनाच या ‘धनगरी ओव्या’ स्मरत असतील. आज पॉप्युलर असलेल्या सुफी संगीत आणि ‘धनगरी ओव्यां’मधील स्वरांची आर्तता, तन्मयता ही सारखीच भासते. नेमकी हीच तन्मयता आणि आर्तता, चित्रकार रावसाहेब गुरव यांनी त्यांच्या रंगछटांद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 'धनगर' - 'धनाचा आगर' - 'धनागरे' - 'धनगर'…!! असा आशय असणारा हा व्यक्ती..!! मी या व्यक्तीसमूहाला 'जात' या शब्दामध्ये सिमीत करू इच्छित नाही. 'धनगरा'चा देव म्हणजे, 'बिरोबा' किंवा 'वीरराजा', वीर महाराज असंही संबोधल जातं. या 'बिरोबा'च्या नावाने 'चांगभलं' म्हणत चित्रकार गुरवांनी रंगांची उधळण करीत, त्यांच्या कॅनव्हासला बोलायला लावलंय.

पारंपारिक धनगर म्हणजे हातात डोक्याहून उंच काठी, पाठीवर रुळणारी घोंगडी जी खांद्यावर स्थिरावलीय, भालप्रदेशावरील भंडारा, त्यावर कुंकू अशा वर्णनाच्या व्यक्तीमत्त्वांचा उपयोग, चित्रकार रावसाहेब गुरव यांनी त्यांच्या कलाकृती चितारतांना केलेला आहे. ‘सुंबरान’ म्हणजे ‘आठवण’…!! लहानपणापासून, कोल्हापूर जवळील शिरोळच्या ग्रामीण वातावरणात वावरलेल्या चित्रकार रावसाहेब यांनी, पुण्याच्या सुप्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयात, सहाय्यक अधिव्याख्याता, अधिव्याख्याता आणि प्राचार्य म्हणून जबाबदार्‍या पार पाडलेल्या आहेत.

सध्या त्यांनी ‘रावसाहेब गुरव फाऊंडेशन’ सुरू केलेले असून त्या फाऊंडेशनमार्फत देश-विदेशातील चित्रकारांना एकत्रित करण्याचा उपक्रम सुरू ठेवलेला आहे. स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणार्‍या प्रा. गुरव यांची अनेक ठिकाणी अनेक प्रदर्शने, समूह प्रदर्शने झालेली आहेत.

चित्रकाराची ओळख, ही त्याच्या शैली आणि तंत्रांमुळे निर्माण होते. चित्रकार रावसाहेब गुरव यांची ओळख ही त्यांच्या ‘धनगरा’मुळे दृढ झालेली दिसते. मूर्त शैली प्रकारातील त्यांच्या कलाकृती स्मृतीप्रवण ठरतात. जुन्या पारंपारिक धनगरापासून मोबाईलवर संवाद साधणार्‍या मॉडर्न धनगरापर्यंत सर्वच स्तरातील, ‘सुधारणा होत गेलेल्या या व्यक्तीमत्त्वा’ला प्रा. रावसाहेब गुरव यांनी जगभर पोहोचविले आहे. रंगांची बैठक, कॅनव्हासचे व्यासपीठ आणि विचारांचे चिंतन याद्वारे चित्रकाराने कलाकृती साकारलेली आहे. रंगलेपनातील सफाई, कुंचल्याद्वारे मिळविलेला पोत आणि आकारांतील ठाम वैविध्यता या वैशिष्ट्यांमुळे ‘सुंबरान’ हे प्रदर्शन एक प्रकारची ‘आठवण’ राहणार आहे.

लाल, पिवळा, नारिंगी, निळा या रंगांचा अधिकाधिक उपयोग असलेल्या त्यांच्या कलाकृती या दुरूनही लक्षवेधक ठरतात. रंग सिद्धांताचा यथोचित वापर करून, रंगांना त्यांच्या आशयासह चित्रविषयाबरोबर जोडून एक प्रकारचा दृश्यानुभव साधण्यात त्यांच्या कलाकृती यशस्वी झालेल्या दिसतात. दि. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च (२०१४) या कालावधीत त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगिर कलादालन, मुंबई येथे सुरू आहे.

-प्रा. गजानन शेपाळ
http://mumbaitarunbharat.in/?p=4118

(24) धनगरांची ओवी गीतं

मानवी संस्कृती ही मानवाची निर्मिती असल्यामुळे मानवाने तिला वेळोवेळी निरनिराळया पर्वात व अवस्थांमध्ये दिशा व आकार दिला आहे. संस्कृती स्वत:च्या स्वयंगतीने बदलत व वाढत गेली. संस्कृती म्हणजे समाजाची जगण्याची रीत व शैली होय. तिच्यावर अनेक घटकांचा व शक्तींचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे ती वेगवेगळे आकार व वळणे घेत असते. तिला भूतकाळातील सातत्य लाभते. जीवंत वनस्पतीप्रमाणे संस्कृती एक सजीव वस्तू असून, तिला वाढायची स्वत:ची जणू अंत:प्रेरणा व स्वयं गतिमानता आहे.सुप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ लेवीज मुनफोर्ड या संस्कृत चिंतकाने संस्कृतीचा मूलगामी सखोल अभ्यास करताना म्हटले आहे. मानव समाज व संस्कृती यांची वाढ व विकास हा क्रमाक्रमाने, वेगवेगळ्या अवस्थांतून होत असतो. संस्कृती हा शब्द काहीसा मूल्यनिरपेक्ष तटस्थ असतो. संस्कृती केवळ एक जीवन पद्धती म्हणून जर तिच्याकडे पाहिले तर जगातील सर्वच लोकांच्या विविध संस्कृती सारख्याच मानल्या जातात. पण, बऱयाच वेळा असंस्कृत व सुसंस्कृत असा फरक माणसाच्या वागण्यात, प्रवृत्तीत व सवयीत करण्यात येतो.

समाजातील व्यवहारीक शहाणपण, कला, कौशल्य, प्रामाणिकपणा, पारदर्शकता, वाड्:मयता, तंत्रज्ञान, शास्त्र, भाषा, लिपी, ओव्या, गीते, इत्यादींचे सुस्थितीतील दर्शन, संस्कारांचे श्रवण, निरिक्षण आणि त्यानुसार त्यांच्या कलाकृत्ती घडविणे अशा बहुपेढी परिवर्तनवादी कार्यप्रणालीला संस्कृती असे म्हणावे लागेल. थोडक्यात, कुठल्याही समाजातील संस्कृती ही भ्रामक कल्पना नसून ती त्या समाजातील बदल मूर्त स्वरूपात आणायला लावणारी संकल्पना होय.

मराठी लोकसंस्कृती ही अनेकविध वैशिष्टयांनी नटलेली आहे. ही संस्कृती जोपासण्याचे काम खऱयाअर्थाने भटक्या लोकांनी केलेले दिसते. वास्तविक, पाहता आपण सर्वजन लोकसंस्कृतीचे उपासकच आहोत. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोककला जोपासण्याचे काम भटके लोक करीत असताना दिसताता. यामध्ये वासुदेव, गोंधळ, वाघ्यामुरळी, पोतराज, जोगतीन, कंझारभट, बेलदार आणि धनगर असे अनेक भटके लोक सांगता येतील. आजही खेडय़ा -पाडयांतून व शहरात सुद्धा या भटक्यांचे दर्शन घडले. त्यांची गीते आजही लोकजीवनात प्रचलित आहेत. लोकांच्या मनावर चांगले संस्कार करणे, लोकसंस्कृतीचे महत्व पटवून सांगणे समाज परिवर्तन करणे, समता, स्वातंत्र्य व बंधूभाव निर्माण करणे या आदर्श गुणांमुळेच त्यांच्या गीतांना प्रयोगमुल्य लाभलेले असते.

या एकूण भटक्यांच्यामध्ये धनगर समाज देखील आपल्या कला कौशल्याने ओवीगीतांच्या माध्यमातून लोकसंस्कृती जोपासताना दिसून येतो. उदाहरणार्थ फुगडी, उखाणा, कोडी, देव-देवतांवर गीते, सामाजिक व कौटुंबिक गीते या अशा अनेक माध्यमातून आपल्या बुद्धीकौशल्याने अशिक्षित असून देखील सुंदररीत्या ओवीगीते सादर करून समाज परिवर्तन करण्याचे काम प्रामाणिकपणे करतो. त्यांची ओवीगीते असंख्य पाहता येतील, पण आपण इथे उदाहरणादाखल काही ओवीगीतांचा विचार करणार आहेत.

करमत नाही मला
पत्र देते तुला
रडू नको माझ्यासाठी
माझ्या गुलाबाच्या फुला
भल्लरी दादा भल्लरी…

एकमेकाविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम, अतूट आहे. दोघांमध्ये विरह आला की, एकमेकांवाचून करमत नाही. विरहामध्ये जरी ताटातूट झाली असली तरी. धनगर प्रियेशी आपल्या धनगर प्रियकराला रडू नको म्हणून पत्राद्वारे समजावते. दोघेही पत्रातून एकमेकांशी संवाद साधत असलेले दिसून येतात.

पंढरपुरचे गोसावी बुवा।
माझ्या साळुच्या घरी गेलतात का ?
माझी साळु खुशाल हाय का ?।
हाई पण हाई: तिची सासुच मेली ।
बरी मेली: तरी मेली ।
मांगातली मांगीन : होती गं माय ।
साळुला माझ्या गांजीत होती गं माय ।।१।।   

पंढरपुरचे गोसावी बुवा ।
माझ्या साळुच्या घरी गेलतात का ?
माझी साळु खुशाल हाय का?।
हाय पण हाय, तिची नणंदच मेली।
बरी मेली : बरी मेली।
हाडुळीतली हाडुळीन, होती गं माय, ।
साळुला माझ्या गांजीत होती गं माय।।२।।

पंढरपुरचे गोसावी बुवा ।
माझी साळु खुशाल हाय का ?
हाय पण हाय : तिचा सासराच मेला ।
बरा मेला, बरा मेला
सरणातला सरप, होता गं माय।
साळुला माझ्या गांजीत होता गं माय ।।३।।

वरील ओवीगीतांतून विनोद व उत्तम असा संवाद साधला आहे. धनगर स्त्रीला इतर स्त्रियांप्रमाणे सासुरवास असतो. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमुळे धनगर स्त्रीला कुटुंबामध्ये दुय्यम स्थान असते. सासरी सासू, नणंद आणि सासरा छळ करीत असतात. पोटाला साधे पोटभर जेवण देखील मिळत नाही. दिवस दिवस कष्टाची कामे आणि चालताबोलता सतत सासूचे टोमणे खावे लागते. या छळाबाबत आई रात्रंदिवस काळजी करत असते. म्हणून आई गोसाव्याजवळ आपल्या धनगर मुलीची खुशाली विचारत असते. गोसावी आणि आई यांचा संवाद धनगर स्त्रीने गीतांतून हुबेहुब मांडला आहे.

आपुन दोघी सोबतीनी, एक पान खाऊ
इंग्रजी साळत शिकायला जाऊ
इंग्रजी साळत बत्तीस मुलं
आपापल्या बहिणीला गुलाबाची फुलं
गुलाबांच्या फुलांचा घमघम वास
आत्याची पोरगी मॅट्रीक पास
नवऱयाला म्हणती भांडी घास
नवरा उठला दणक्यांनी
लाथ बसली खणक्यांनी….

धनगर मुलीच्या फुगडीच्या गीतातुंन विविध प्रसंग, विनोद दृष्टीने येत असतात. गावातील इतर समाजातील मुली शिकलेल्या पाहून त्यांना विशेष नवल वाटते. आपण सुद्धा इंग्रजी शाळेला शिक्षण घेण्यासाठी जावं असे त्यांना सतत वाटते. आत्याची मुलगी मॅट्रीक पास झालेली असल्यामुळे नवरा तिचे सर्व काम करत असतो. ती नवऱयाला भांडी घासायला सांगते. पण नवऱयाला तो आपला अपमान वाटतो. त्यामुळे तो बायकोच्या कमरेत लाथ घालतो. इथे परंपरा किती माणसाच्या मनात घट्ट रुजलेल्या असतात याचे दर्शन वरील गीतांतून घडते.

इठ्ठला-इठ्ठला, कधी येता ना माझ्या घरां
माझ्या घरी शेळ्या-मेंढय़ा
तुमच्या घरी पताका दिंडय़ा
इठ्ठला-इठ्ठला, कधी येता ना माझ्या घरां।
माझ्या घरी दाळीदुळी
तुमच्या घरी वनमाळी..

वरील गीतांतून धनगर समाजानुभूतीची दृष्टी दिसून येत असल्यामुळे धनगर समाज जीवनाचे दर्शन अशा प्रकारच्या गीतांतून होताना दिसते. धनगर स्त्रिया भजनामध्ये सेत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे लिखित अभंग म्हणत नाहीत तर लोकपरंपरांनी चालत आलेली लोकसंस्कृतीतील गीते म्हणताना दिसतात.

सुंबरानं मांडिलं गा, सुंबरान मांडिलं
सुंबरानं मांडिलं, बिरु गा देवाचं
धरतरी मातेचं, मेघराया पित्याचं
चांदसूर्या बंधूचं , चांदसूर्यादोघांच

महाराष्ट्र धनगर लोकजीवनात सुंबरान, या धनगरी आख्यानामध्ये स्वत:चे असे आगळे-वेगळे स्थान आहे. गाणं, नाचण आणि वाजविणं, या तिन्ही कलांचा सुमेळ सुंबरानमध्ये दिसून येतो. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पहावयास मिळणाऱया धनगर या जाती समुहातील एक विशेष गायन प्रकार म्हणून सुंबरान हे आख्यान काव्य आजही ओळखले जाते. ओवीच्या छंदातील या रचना प्रकाराला मराठी लोकगायनातील महाकाव्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सुंबरान मधून जी ओवीबद्ध लोकाख्यानं म्हटली जातात ती प्रदीर्घ अशा कथेवर आधारीत असतात. ही कथा लोककथेच्या जातकुळातीलच असते. ही आख्याने गद्य-पद्य स्वरुपात गायली जातात. लोककथा, नाटय़ आणि संवाद यांच्या साह्यानेच सुंबरान आकार घेत असते.

देवा नारायणा एकच माझं मागणं
मला पाईजे सौभाग्याचं मरण,
दागिनं-दुगिन्याची
नार झाकून घेती गळां
हळदी- कुंकवाचा
नित्य उघडा पान-मळा…

धनगर स्त्रियांना सौभाग्याचं प्रतिक असलेले कपाळीचं कुंकू ही त्यांना महत्वाचा दागिना वाटतो. बाकीचे दागिने नसले तरी चालतील, परंतु कपाळीच्या कुंकवाला जपणारी इतर हिंदू स्त्रिायांसारखी ही स्त्री आहे. म्हणूनच ती या कुंकवाविषयीची आपुलकी गीतांतून व्यक्त करते.

मांडवाच्या दारी का गं वरमाई येती-जाती
बंधुच्या आहेराची वाट चोरुन पाहती…
शिंप्याच्या दुकानात
बंधू बसला भोळा राजा
तेज्या जीवावरी
उच घडिला हात माझा..

अशी अनेक गीते स्त्रीच्या मुखातून अगदी सहजतेने बाहेर पडतात. घरची परिस्थिती अगदी गरिबीची असली तरीदेखील अशा शुभप्रसंगी गरिबीवर मात करून आहेर हा आपलाच आहे हे वरील गीतातून स्पष्ट होते.
अशारीतीने धनगर स्त्री-पुरुषाच्या ओवी गीतांतून वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनाबरोबरच तिच्या धार्मिक, सांस्कृतिक जीवन विशेषांचेही विविध पैलू ओवीगीतांतून अभिव्यक्त होताना दिसतात. यामध्ये तिचे धर्माचरण, देवावरची श्रद्धा, व्रत वैकल्य आणि नवस इत्यादींच्या समावेश होतो. त्यांची प्रत्येक ओवी गीते लोकसंस्कृती जपताना दिसतात. कुठेही भडकपणा, अश्लिलपणा दिसत नाही. जे आहे ते सत्य या भूमिकेतून गीतांतून मांडणे आणि समाजाची लोकसंस्कृती कशी आहे, कशी नाही हे बोली भाषेतून व्यक्त करणे, यामुळे त्यांची ओवीगीते आजही तितकीच महत्वाची ठरतात.

धनगर स्त्री-पुरुषांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांची एकूण गीते ही राधा-कृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, विठ्ठल-बिरदेव, खंडोबा-बाणाई, राम-सिता, धुळोबा-भिवाया या देवदेवतांची दिसून येतात. यातूनच एकमेकांविषयीचा आदर, प्रेमभाव, सहकार्य वृत्ती वाढीस लागण्यास खऱया अर्थाने मदत होते. पूर्वीच्या आणि सध्याच्या संस्कृतीवर लोकसंस्कृतीचा प्रभाव परंपरेने पडत असलेला दिसून येतो. तसेच कृषिगीते, विधिगीते, डोहाळ, पाळणे, लग्नसमारंभातील गीते, बारसे, जन्म या सर्वांतून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. पिढय़ान्-पिढय़ांच्या सांस्कृतिक प्रथा आजही पहावयास मिळतात. जुने ते सोने, या प्रथेप्रमाणे धनगरांनी या प्रथा धार्मिक भावनेतून, श्रद्धेतून टिकविल्या आहेत.

संदर्भ :
1. सौ. हाके लक्ष्मी हरिबा : कारंडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
2. सौ. खरात बाळाबाई भगवान : करातवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
3. सौ. मोटे सुरेखा अशोक : गोळेश्वर, ता. कराड, जि. सातारा.
4. सौ. पुकळे स्वाती विलास : पुकळेवाडी,ता. माण, जि. सातारा.
5. तत्रैव
6. शेंडगे दत्तात्रय मारुती : कराड, ता. कराड, जि. सातारा.
7. हुलवान इंदुबाई आकाराम : कर्वे, ता. कराड, जि. सातारा

- प्रा. तानाजी ज्ञानदेव पाटील
http://dhangarraja.com/?p=183#more-183

(23) ‘धनगर’ वचनबद्ध आहे !

काना-मात्राचा डावपेच नसलेला
मराठीत एक शब्द आहे
दिल्या शब्दास जागणारा
‘धनगर’ वचनबद्ध आहे !

-बाळासाहेब गवाणी-पाटील
http://www.marathimati.net/dhanagar-vachanbaddha-ahe/