( महाराष्ट्रातील विस्मृतीत गेलेले एक प्रतिभावंत साहित्यिक, रानकवी - यशवंत तांदळे यांच्याविषयी माहिती देणारा श्री. रघुराज मेटकरी लिखित लेख )
पृथ्वीमातेला पडलेले एक निरागस स्वप्न म्हणजे रानकवी यशवंत तांदळे. १९७६ साली ५१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कराड येथे भरलेले होते. या संमेलनात सहभागी व्हायला अनेक साहित्यिक जमलेले. या झकपक साहित्यिकांच्या गर्दीत मळकट धोतर, मळकट पांढरा शर्ट व लाल भडक मुंडासे आणि खांदयावर घोंगडे अशा अवस्थेत एक अडाणी धनगर व्यासपीठाजवळ आला. आणि "मला एक कुंडका म्हणू दया" अशा विनंत्या करू लागला. पण त्याच्याकडे लक्ष देते कोण ? संयोजक, निवेदक आपापल्या नादात गर्क. पण समोर मंडपात रसिकश्रोत्यांच्या गर्दीत कै. यशवंतराव चव्हाण साहेब (भारत सरकारचे वित्तमंत्री) यांनी तांदळेला कविता वाचायला संधी दयावी अशी चिट्ठी पाठवली. तांदळे व्यासपीठावर गेले. त्यांचा अवतार बघून सर्वच जण आता हा खुळा काय म्हणतो अशा नजरेने बघू लागले. आणि यशवंत तांदळे यांनी लाखो लोकांचा फड जिंकण्याच्या अविर्भावात 'बिजमाशी' नावाची कविता सादर केली. त्यांच्या कवितेने थोर साहित्यिक पु.ल.देशपांडे भारावून गेले. त्यांनी व्यासपीठावर जाऊन तांदळेना मिठी मारली. सर्व रसिकांच्या मधून धो धो पाऊस पडावा तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. पु.ल.देशपांडे म्हणाले, "अंगाचा सुगंध लाभलेला हा सोनकेवडा आहे" तर ग.दि.माडगुळकर म्हणाले, "यशवंत तांदळे म्हणजे पैलू न पाडलेलं हे अनगड आणि अनमोल माणिक आहे" यशवंतराव चव्हाण म्हणाले, "स्वतःच आत्मजागृती केलेला हा खरा शारदेचा पुत्र आहे" यशवंत तांदळे बिजमाशी कवितेत म्हणाले होते - "बिजमाशी असतीया लहान । ती फुलोऱ्यात बसतीया लपून । मग जोंधळा जातूया वाळून । आता शेतकरी जगल कशानं ।।" यशवंत तांदळे यांचा खांदयावर घोंगडे, डोक्याला मुंडासे आणि पु.ल. नी मारलेली मिठी असे छायाचित्र पहिल्या पानावर तमाम वृत्तपत्रांनी छापले होते.
देवराष्ट्रे जवळ 'आसद' नावाचे गाव आहे. (सध्या तालुका कडेगाव) तेथे लखू तांदळे नावाचा एक धनगर समाजातील गरीब शेतकरी राहत होता. मायाक्का असे त्यांच्या पत्नीचे नाव होते. त्यांच्या पोटी यशवंत तांदळे यांचा जन्म झाला. घरचे दारिद्र्य पाचवीला पुजलेले. आई वडील दुसऱ्याच्यात मेंढरे राखायची चाकरी करीत. मामाने (ज्ञानदेव मेटकरी, विटा) यशवंतला पाच मेंढरे दिली. यशवंत शाळा वैगीरे न शिकता मेंढरे राखू लागला. पाच मेंढरांची त्याने शंभर मेंढरे केली. रानात मेंढरे राखताना त्याला कविता सुचू लागल्या. शेतकऱ्यांच्या पुढे कविता सादर करून तो वाहवा मिळवू लागला.
चारी शबुद सारखे । आम्ही चतुर पारखे ।
सोनार घडवीत होता तोडा । मांग आटीत होता नाडा ।
चांभार शिवीत होता जोडा । फौजदार उडवीत होता घोडा ।
चारी सबुद सारखं । आम्ही राव चतुर पारखं ।
कोष्टी विणत होता साडी । गवंडी बांधीत होता माडी ।
न्हावी करीत होता दाडी । लोहार आवळीत होता गाडी ।
चारी सबुद सारखं । आम्ही राव चतुर पारखं ।
ख्रिश्चन बसला होता बोडका । बायको उडवीत होती फडका ।
माळी विकत होता दोडका । सरकार बांधीत होते सडका ।
चारी शबुद सारखे । आम्ही राव चतुर पारखे ।
अशा शेकडो कवितांचा खजिना त्यांनी स्वतःच रचलेला होता. तो त्यांच्या तोंडपाठ होता. त्यांच्या कवितेत ग्रामीण बेरकीपणा व समाजातील नेमकी व्यंगे असायची. त्यामुळे श्रोते पोटभरून हसायचे. सासू-सुनांचा संवाद, आईची बाजू घ्यावी की बायकोची बाजू घ्यावी या विवंचनेत सापडलेला मुलगा, माहेरी निघालेली सून, सासरी जाणारी लेक, समाजातील दारूचे व्यसन, मिश्री, तपकीर तंबाखू यावर ते चुटके सांगून लोकांना हसवायचे. तीन-तीन तास लोक न कंटाळता त्यांचा कार्यक्रम ऐकत बसायचे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर तांदळे महाराष्ट्राला माहीत झाले. गावोगावचे लोक मानधन देऊन त्यांना कार्यक्रमाला बोलावू लागले. शे-दोनशे मानधन हातावर टेकवू लागले. तांदळेही वेडयासारखे रोज रोज नवे गाव करू लागले. घरी पत्नी वैजयंता, लहानगा मुलगा पोपट, प्रमिला, बाबूबाई व राजश्री या तीन मुली सर्व कच्ची बच्ची. तांदळे कार्यक्रम करण्यात वाहून गेले. त्यांना प्रकृतीचेही भान राहिले नाही. पु.ल.देशपांडे आग्रह करत असतानाही कवितासंग्रह छापला गेला नाही. रोज नवे गाव ते करायचे. मिळेल ते खायचे. विश्रांती नाही. त्यामुळे त्यांना घशाचा कँन्सर झाला. मा. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांनी मुंबईला त्यांची औषधपाण्याची सोय केली. पण तेथे थांबायला तांदळे जवळ माणूस नाही. त्यामुळे तांदळे तेथे थांबले नाहीत. ते कार्यक्रम करीत राहिले. महाराष्ट्र हिंडत राहिले. रोग वाढत गेला व त्यानंच महाराष्ट्राचा प्रतिभावंत साहित्यिक, रानांत फुले सहज फुलवीत तशी कविता करणारा कवी काळाच्या पडदयाआड गेला. अगदी कायमचा…
(सौजन्य - www.mysangli.com)